१९६२ हेल्पलाइन आणि व्हॉट्सॲप चॅटबॉटमुळे पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम; शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार तज्ज्ञांचा सल्ला

पशुसंवर्धन विभाग आणि भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमातून सुरू असलेल्या १९६२ हेल्पलाइनला आता व्हॉट्सॲप चॅटबॉटची जोड देण्यात आली आहे. या सुविधेमुळे महाराष्ट्रातील पशुपालकांना घरबसल्या पशुवैद्यकीय सल्ला, सरकारी योजनांची माहिती आणि व्हिडिओ कन्सल्टेशनची सुविधा उपलब्ध होणार आहे.

Jun 4, 2026 - 21:59
 0  5
१९६२ हेल्पलाइन आणि व्हॉट्सॲप चॅटबॉटमुळे पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम; शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार तज्ज्ञांचा सल्ला
१९६२ हेल्पलाइन, व्हॉट्सॲप चॅटबॉट, पशुवैद्यकीय सेवा,

१९६२ हेल्पलाइन आणि व्हॉट्सॲप चॅटबॉटमुळे पशुवैद्यकीय सेवा अधिक सक्षम; शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार तज्ज्ञांचा सल्ला

पुणे प्रतिनिधी, दि. ३ : महाराष्ट्रातील पशुपालक आणि शेतकऱ्यांना अधिक सुलभ, जलद आणि तंत्रज्ञानाधारित पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गेल्या पाच वर्षांपासून यशस्वीपणे सुरू असलेल्या १९६२ टोल-फ्री हेल्पलाइन सेवेला आता व्हॉट्सॲप चॅटबॉटची जोड देण्यात आली असून, त्यामुळे पशुवैद्यकीय सेवा आणखी गतिमान होणार आहेत.

भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड (इंडसइंड बँक) आणि महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या १९६२ हेल्पलाइनद्वारे राज्यभरातील ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना मोबाईल व्हेटरिनरी युनिटच्या माध्यमातून पशुवैद्यकीय सेवा पुरविल्या जात आहेत. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत ८ लाखांहून अधिक जनावरांवर उपचार करण्यात आले आहेत.

नवीन व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी +91 9063142299 या क्रमांकावर "Hi" असा संदेश पाठवायचा आहे. या माध्यमातून पशुधनाचे आजार, उपचार, लसीकरण, पशुसंवर्धनविषयक माहिती, विविध सरकारी योजना तसेच पशुवैद्यकीय डॉक्टरांशी थेट संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सेवेमध्ये चॅट, ऑडिओ कन्सल्टेशन आणि व्हिडिओ कन्सल्टेशनच्या सुविधा उपलब्ध आहेत. तसेच पशुवैद्यकीय रुग्णालयांची माहिती, सेवा निर्देशिका, वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि सरकारी योजनांची सविस्तर माहितीही शेतकऱ्यांना मिळू शकते.

ऑक्टोबर २०२५ ते मे २०२६ या कालावधीत ६१५ शेतकऱ्यांनी चॅटबॉटचा वापर केला असून २०१ व्हिडिओ कन्सल्टेशन यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहेत. या डिजिटल उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च वाचणार असून पशुधनाच्या आरोग्य व्यवस्थापनात मोठी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना तात्काळ सेवा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले असून राज्यातील पशुपालक व शेतकरी बांधवांनी १९६२ हेल्पलाइन आणि व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0