‘आपला दवाखाना’ योजनेचा विस्तार; राज्यातील ६७४ केंद्रांतून नागरिकांना मोफत आरोग्य सेवा

राज्यातील शहरी, झोपडपट्टी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेअंतर्गत आतापर्यंत ६७४ दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. उर्वरित २६ दवाखानेही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

May 22, 2026 - 23:21
 0  7
‘आपला दवाखाना’ योजनेचा विस्तार; राज्यातील ६७४ केंद्रांतून नागरिकांना मोफत आरोग्य सेवा
आपला दवाखाना योजना, प्रकाश आबिटकर, मोफत आरोग्य सेवा,

मुंबई, दि. २२ : राज्यातील सर्वसामान्य, शहरी, झोपडपट्टी परिसरातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेली ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून राज्यात आतापर्यंत ६७४ दवाखाने कार्यान्वित करण्यात आले आहेत. उर्वरित २६ दवाखाने लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, राज्य शासनाने ११ जुलै २०२३ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यभरात ७०० ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली होती. या योजनेचा मुख्य उद्देश शहरी भागातील गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या राहत्या परिसरात प्राथमिक आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देणे हा आहे.

या योजनेअंतर्गत ४७५ दवाखाने शासकीय संस्थांमार्फत तर २२५ दवाखाने बाह्य संस्थांमार्फत चालविण्यात येत आहेत. सध्या ४४९ दवाखाने ‘इन-हाऊस’ पद्धतीने आणि २२५ दवाखाने बाह्य संस्थांमार्फत सुरू असून एकूण ६७४ केंद्रांमधून नागरिकांना आरोग्य सेवा दिली जात आहे.

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील २१ आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रातील ५ नवीन दवाखाने लवकरच सुरू होणार आहेत.

‘आपला दवाखाना’मधील सुविधा

या योजनेअंतर्गत नागरिकांना खालील सेवा मोफत दिल्या जात आहेत :

बाह्यरुग्ण तपासणी (OPD सेवा)

१०५ प्रकारची मोफत औषधे

३० प्रकारच्या प्रयोगशाळा तपासण्या

गरोदर मातांची आरोग्य तपासणी

मानसिक आरोग्य समुपदेशन

संदर्भ वैद्यकीय सेवा

मोफत लसीकरण सुविधा

मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, ही योजना केवळ उपचार सेवा देण्यापुरती मर्यादित नसून नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य सुरक्षेचा महत्त्वाचा आधार बनत आहे.

मनुष्यबळ भरतीलाही गती

या योजनेसाठी प्रत्येक दवाखान्याला वार्षिक आर्थिक तरतूद करण्यात आली असून वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, आरोग्य सेवक, सुरक्षा रक्षक आणि सफाई कर्मचारी अशी आवश्यक मनुष्यबळ व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

एप्रिल २०२६ अखेरपर्यंत मंजूर ३५०० पदांपैकी २९५७ पदे भरली गेली असून उर्वरित पदभरती प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

बैठकीला आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा (शहरी) आयुक्त सुनील भोकरे, अतिरिक्त आयुक्त (एनयूएचएम) जगन्नाथ वीरकर तसेच सहसंचालिका डॉ. सुनिता गोल्हाइत उपस्थित होत्या.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0