निष्पाप नागरिकाच्या मृत्यूस कारणीभूत बेफिकीर केबल जाळ्यावर तात्काळ कारवाई करा : आमदार अमित गोरखे

पिंपरी-चिंचवडमध्ये लोंबकळणाऱ्या अनधिकृत केबलमुळे महिलेचा मृत्यू झाल्यानंतर आमदार अमित गोरखे यांनी प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला. संपूर्ण शहरातील धोकादायक ओव्हरहेड वायरिंग २४ तासांत हटवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Apr 29, 2026 - 19:25
 0  3
निष्पाप नागरिकाच्या मृत्यूस कारणीभूत बेफिकीर केबल जाळ्यावर तात्काळ कारवाई करा : आमदार अमित गोरखे
अमित गोरखे, पिंपरी चिंचवड

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी-चिंचवड : शहरात अनधिकृत केबल आणि इंटरनेट वायरींचे जीवघेणे जाळे पसरले असून प्रशासकीय दुर्लक्षामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. सेक्टर २६ परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर आमदार अमित गोरखे यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल करत धोकादायक ओव्हरहेड वायरिंगवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

काल सेक्टर २६ परिसरात वाय-फाय केबल गळ्यात अडकून श्रीमती संपदा पटवर्धन यांचा मृत्यू झाला. ही घटना केवळ अपघात नसून प्रशासनाची अनास्था आणि संबंधित कंपन्यांचा निष्काळजीपणा यामुळे झालेली हत्या असल्याचे तीव्र शब्दांत अमित गोरखे यांनी म्हटले आहे.

घटनेचे गांभीर्य

प्रबोधन सोसायटीमधील श्रीमती पटवर्धन या ज्ञानप्रबोधिनी शाळेतून घरी परतत असताना शीतछाया परिसरात रस्त्यावर लोंबकळणाऱ्या केबलमुळे हा अपघात घडला. अवघ्या ४ ते ५ फूट उंचीवर मृत्यूचे पाश सोडल्याप्रमाणे केबल्स टाकणाऱ्या संबंधित इंटरनेट आणि वाय-फाय कंपन्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम

या घटनेची गंभीर दखल घेत आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त आणि संबंधित विभागाला पत्र दिले आहे. त्यामध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत:

मृत महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी

शहरातील सर्व धोकादायक आणि लोंबकळणाऱ्या केबल्स २४ तासांत हटवाव्यात

संबंधित कंपनीचा परवाना रद्द करावा

कंपनीवर फौजदारी गुन्हा दाखल करावा

अंतर्गत रस्त्यांवर आवश्यक ठिकाणी दर्जेदार स्पीड ब्रेकर बसवावेत

यापूर्वीही दिला होता इशारा

पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत ओव्हरहेड वायरिंगचे जाळे वाढत असल्याबाबत अमित गोरखे यांनी यापूर्वीही नगरविकास विभागाकडे लेखी पत्राद्वारे पाठपुरावा केला होता. मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवरील धोकादायक वायरिंग हटवून ठोस धोरणात्मक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती.

‘आता आरपारची लढाई’

श्रीमती संपदा पटवर्धन यांना श्रद्धांजली अर्पण करत गोरखे यांनी त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त केल्या. यापुढे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आता आरपारची लढाई लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0