बकरी ईद शांततेत आणि नियमांचे पालन करून साजरी करा; जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आवाहन

आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठक पार पडली. महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा कायद्याचे निकष पाळून बकरी ईद शांततेत साजरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

May 22, 2026 - 22:18
 0  3
बकरी ईद शांततेत आणि नियमांचे पालन करून साजरी करा; जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आवाहन
बकरी ईद २०२६, कोल्हापूर जिल्हाधिकारी, डॉ विजय राठोड,

कोल्हापूर, दि. २२ (जिमाका) : आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) कायदा १९९५ अंतर्गत लागू असलेल्या नियमांचे पालन करून बकरी ईद शांततेत आणि सुव्यवस्थित वातावरणात साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले.

राजर्षी शाहू सभागृहात आयोजित या बैठकीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमीन, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. पल्लवी पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल, कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त परितोष कंकाळ, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रमोद बाबर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सांगितले की, ४ मार्च २०१५ पासून राज्यात महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) कायदा १९९५ लागू करण्यात आला असून या कायद्यांतर्गत गाय, वळू आणि बैल यांच्या कत्तलीवर बंदी आहे. त्यामुळे संबंधित कायद्याचे सर्व निकष आणि नियम पाळून सण साजरा करण्यात यावा.

कत्तलखान्यांच्या अनुषंगाने आवश्यक माहिती संकलित करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. तसेच नदी, नाले आणि सार्वजनिक ठिकाणी प्रदूषण होणार नाही याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस विभागाने विशेष दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी जिल्ह्यातील आठ आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यांवर पशुसंवर्धन विभागाने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीला सहआयुक्त (पशुसंवर्धन) डॉ. महेश शेजाळ, डॉ. प्रशांत कुलकर्णी, डॉ. प्रसाद भुतकर, डॉ. जितेंद्र पाठक, डॉ. रवींद्र जंगम, डॉ. श्याम कोळेकर, डॉ. मंगेश खिलारे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रशासनाने नागरिकांना कायद्याचे पालन करून शांतता, स्वच्छता आणि सामाजिक सलोखा राखत बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 1
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0