नागरिकांच्या तक्रारी प्रशासनासाठी कान व डोळ्यासारख्या; वेळेत निराकरणाला प्राधान्य द्या – आयुक्त अश्विनी भिडे

महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी नागरिकांच्या तक्रारींना प्रशासनासाठी ‘कान आणि डोळे’ असे संबोधत त्यांचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश दिले. कीटकनाशक नियंत्रण, खाद्य कचरा व्यवस्थापन, बांधकाम स्थळांवरील स्वच्छता आणि ‘मार्ग’ अॅपच्या प्रभावी वापरावरही त्यांनी भर दिला.

May 20, 2026 - 23:44
May 20, 2026 - 23:45
 0  16
नागरिकांच्या तक्रारी प्रशासनासाठी कान व डोळ्यासारख्या; वेळेत निराकरणाला प्राधान्य द्या – आयुक्त अश्विनी भिडे
अश्विनी भिडे, मुंबई महानगरपालिका, नागरिक तक्रारी,

मुंबई, दि. २० : नागरिकांकडून विविध नागरी समस्यांबाबत येणाऱ्या तक्रारी प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असून त्या प्रशासनासाठी ‘कान आणि डोळ्यांप्रमाणे’ काम करतात. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत त्यांचे वेळेत निराकरण करणे हे प्रशासनाचे प्राधान्य असावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.

महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी पहाटे फोर्ट परिसर, स. का. पाटील उद्यान, नाना चौक परिसर आणि वरळी येथील लव्हग्रोव्ह पर्जन्य जल उदंचन केंद्रास भेट देऊन विविध कामांची पाहणी केली.

यावेळी त्यांनी कीटकनाशक नियंत्रणासाठी अधिक प्रभावी यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले. विशेषतः रस्त्यांलगतची दुकाने, खाऊगल्ली आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांमधून निर्माण होणाऱ्या अन्न कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला.

त्यांनी सांगितले की, अन्न कचऱ्यामुळे उंदीर, डास आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे खाद्य व्यवसायिकांनी अन्न कचरा योग्य प्रकारे संकलित करून महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे.

बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण यंत्रणा उभारण्याच्या सूचना देतानाच संबंधित विकासकांनी कर्मचारी नेमणूक आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांच्या तक्रारी, अभिप्राय आणि सूचना या प्रशासनासाठी महत्त्वाचा ‘रेडी फीडबॅक’ असल्याचे सांगत त्यांनी मदतसेवा क्रमांक, समाजमाध्यमे आणि विविध माध्यमांतून येणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यावर भर दिला.

यासाठी महानगरपालिकेने सुरू केलेल्या ‘मार्ग’ (Management and Redressal of Grievances) या अॅप्लिकेशनचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उदंचन केंद्रातील यंत्रणा पूर्णपणे कार्यरत ठेवण्यासोबतच पाणी साचणाऱ्या भागांमध्ये उपसा यंत्रणा तत्पर राहतील याची खबरदारी घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.

यावेळी आयुक्त भिडे यांनी कीटकनाशक नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची पाहणी केली. तसेच स्वच्छता, मूषक नियंत्रण, कर्मचारी उपस्थिती नोंदवही आणि इतर कामकाजाची माहिती घेतली.

दरम्यान, नागरिक, कर्मचारी, कामगार तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही त्यांनी कौतुक केले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0