महसूल वसुलीत उत्कृष्ट कामगिरी – विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर यांच्याकडून BMC कर्मचाऱ्यांचे कौतुक
मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण, जल अभियंता आणि अनुज्ञापन विभागांनी २०२५-२६ आर्थिक वर्षात अपेक्षेपेक्षा जास्त महसूल वसुली करत उत्कृष्ट कामगिरी केली. विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर यांनी अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
महसूल वसुलीत उत्कृष्ट कामगिरी; विधी समिती अध्यक्षा दिक्षा कारकर यांच्याकडून अधिकाऱ्यांचे कौतुक
मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन, जल अभियंता आणि अनुज्ञापन विभागांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षात महसूल वसुलीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विधी समिती अध्यक्षा श्रीमती दिक्षा हर्षद कारकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
१ एप्रिल २०२६ रोजी विधी समिती दालनात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी या विभागांच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी मालमत्ता कर, जल देयक तसेच जाहिरात फलकांच्या माध्यमातून मिळणाऱ्या महसुलावर विशेष चर्चा करण्यात आली.
महानगरपालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ७,३४१ कोटी रुपयांचे महसूल उद्दिष्ट निश्चित केले होते. मात्र, करनिर्धारण व संकलन विभागाने या उद्दिष्टालाही मागे टाकत तब्बल ७,६१० कोटी ९० लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला. ही कामगिरी विशेष उल्लेखनीय असल्याचे कारकर यांनी नमूद केले.
याशिवाय, जल अभियंता आणि अनुज्ञापन विभागांनीही जल देयके आणि जाहिरात महसुलाच्या बाबतीत समाधानकारक आणि प्रभावी कामगिरी बजावली. या सर्व विभागांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे महानगरपालिकेच्या महसुलात लक्षणीय वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
या यशाबद्दल सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत, भविष्यातही अशीच कामगिरी कायम ठेवावी, अशी अपेक्षा दिक्षा कारकर यांनी व्यक्त केली.
या बैठकीला उप जल अभियंता (नियोजन व नियंत्रण) मंगेश शेवाळे, उप करनिर्धारक व संकलक अशोक मासाळ, अनुज्ञापन अधीक्षक अनिल काटे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान विविध विभागांनी मिळवलेल्या महसुलाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आणि पुढील काळात महसूल वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0