वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून झाडांची विशेष काळजी

मुंबईतील वाढत्या तापमानामुळे झाडांवर होणारा ताण कमी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सार्वजनिक ठिकाणांतील झाडांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खासगी परिसरातील झाडांसाठी गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

May 15, 2026 - 23:07
 0  4
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून झाडांची विशेष काळजी
बृहन्मुंबई महानगरपालिका, झाडांची काळजी, उष्णतेची लाट, मुंबई

मुंबई : वाढत्या उष्णतेचा परिणाम मुंबईतील वृक्षसंपदेवर होऊ नये आणि नागरिकांना गारवा मिळावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने झाडांच्या संरक्षणासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणांतील झाडांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून खासगी परिसरातील झाडांसाठी संबंधित गृहनिर्माण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महानगरपालिकेकडून झाडांच्या मुळांना आवश्यक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. झाडांच्या मुळांना पुरेसे पाणी न मिळाल्यास ती कमकुवत होऊन झाडे उन्मळून पडण्याची शक्यता वाढते. तसेच फांद्या कोरड्या व ठिसूळ होऊन तुटण्याचाही धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन झाडांना नियमित पाणी देण्यावर भर देण्यात येत आहे.

या मोहिमेसाठी पिण्यास अयोग्य, मात्र झाडांसाठी उपयुक्त असलेले पाणी वापरण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत रस्ते स्वच्छता मोहिमेदरम्यान पाण्याच्या टँकरद्वारे झाडांना पाणी देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

जी दक्षिण विभागातील केशवराव खाड्ये मार्ग तसेच सांताक्रुझ आणि जुहू परिसरात स्वच्छता मोहिमेसोबत झाडांना पाणी देण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. याशिवाय उद्यान विभागाकडून मुंबईतील विविध भागांमध्ये झाडांची निगा राखणे, आवश्यक ठिकाणी पाणीपुरवठा करणे आणि झाडांच्या आरोग्याची पाहणी करणे ही कामे सातत्याने सुरू आहेत.

वृक्षतज्ज्ञांच्या मते, झाडांना वेळेवर पाणी मिळाल्यास त्यांच्या अंतर्गत पाणी वहन प्रक्रियेला मदत होते आणि उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी होतो. त्यामुळे झाडांची स्थिरता टिकून राहते आणि फांद्या सुकणे किंवा तुटणे यांसारख्या समस्या टाळता येतात.

उन्हाळ्यात झाडांचे संवर्धन करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचे सांगत महानगरपालिकेने नागरिकांना आपल्या परिसरातील तसेच गृहनिर्माण संस्थांच्या आवारातील झाडांना वेळोवेळी पाणी घालण्याचे आवाहन केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0