बीएमसीचा ‘व्हिजन एआय वॉल्ट’ प्रकल्प; जन्म-मृत्यू नोंदी आता काही सेकंदांत उपलब्ध होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई-वॉर्डातील जुने नागरी दस्तऐवज ‘व्हिजन एआय वॉल्ट’ अंतर्गत डिजिटल स्वरूपात जतन केले जाणार आहेत. एआय तंत्रज्ञानामुळे जन्म-मृत्यू आणि विवाह नोंदी काही सेकंदांत उपलब्ध होणार असून नागरिकांना जलद आणि पारदर्शक सेवा मिळणार आहे.

May 15, 2026 - 22:34
 0  20
बीएमसीचा ‘व्हिजन एआय वॉल्ट’ प्रकल्प; जन्म-मृत्यू नोंदी आता काही सेकंदांत उपलब्ध होणार
बीएमसीचा ‘व्हिजन एआय वॉल्ट’ प्रकल्प; जन्म-मृत्यू नोंदी आता काही सेकंदांत उपलब्ध होणार

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ई प्रशासकीय विभागातील जुने नागरी दस्तऐवज आता अत्याधुनिक ‘व्हिजन एआय वॉल्ट’ प्रणालीअंतर्गत डिजिटल स्वरूपात जतन केले जाणार आहेत. या उपक्रमामुळे जन्म-मृत्यू नोंदी, विवाह नोंदी आणि इतर महत्त्वपूर्ण अभिलेख काही सेकंदांत उपलब्ध होणार असून नागरिकांना अधिक जलद, अचूक आणि सुलभ सेवा मिळणार आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या पुढाकारातून हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित या प्रणालीमुळे दस्तऐवजांचे स्कॅनिंग, वर्गीकरण आणि डिजिटल संग्रहण अत्याधुनिक पद्धतीने केले जाणार आहे.

डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले की, ई-वॉर्ड कार्यालयात अनेक दशकांपासून जतन करण्यात आलेले जन्म-मृत्यू नोंदी आणि विवाह अभिलेख हे ऐतिहासिक वारसा आहेत. मात्र कालांतराने अनेक दस्तऐवजांवरील शाई फिकी पडली असून पाने ठिसूळ झाली आहेत. एका प्रमाणपत्रासाठी नागरिकांना अनेक आठवडे किंवा काही वेळा वर्षभर प्रतीक्षा करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर ‘व्हिजन एआय प्रोजेक्ट’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या प्रकल्पांतर्गत लाखो हस्तलिखित नागरी नोंदींचे डिजिटल जतन केले जाणार आहे. एआय प्रणाली मराठी, हिंदी आणि इंग्रजीतील हस्तलिखित मजकूर अचूकपणे वाचू शकणार आहे. तसेच पुसट झालेले अक्षर स्पष्ट करणे, शाईचे डाग दूर करणे आणि जुने, जीर्ण दस्तऐवज नव्याने ओळखण्याची क्षमता या प्रणालीत असणार आहे.

महापालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी महानगरपालिकेच्या विविध डेटाबेसमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचे निर्देश दिले असून डेटा-आधारित आणि नागरिककेंद्रित प्रशासन उभारण्यावर भर दिला आहे.

महापालिकेनुसार, पूर्वी एखादे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किमान ३० दिवस ते काही वेळा दीड वर्षांपर्यंत प्रतीक्षा करावी लागत होती. आता नागरिकाने केवळ नाव टाइप करताच संबंधित नोंद काही क्षणांत उपलब्ध होईल आणि डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणपत्र तत्काळ मिळू शकेल.

या प्रणालीमुळे प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढण्यास मदत होणार असून बोगस प्रमाणपत्रांनाही आळा बसेल. अशी सुविधा वापरणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ई विभागाचे सहाय्यक आयुक्त आनंद कंकाळ यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 6
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1