आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाच्या योजनांचा आढावा घेत दर्जेदार आणि नागरिकाभिमुख आरोग्य सेवा उभारण्याचे निर्देश दिले. आयुष्मान आरोग्य मंदिर, क्रिटिकल केअर ब्लॉक, वैद्यकीय महाविद्यालये आणि एचपीव्ही लसीकरण मोहिमेला गती देण्यावर भर देण्यात आला.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
राज्यातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि परिणामकारक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री वॉर रूम अंतर्गत आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेताना संबंधित विभागांना गुणवत्ता आणि गतीला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.
मुंबई येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन, क्रिटिकल केअर ब्लॉक, एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, नवीन वैद्यकीय महाविद्यालये तसेच एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात शहरी आणि ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी तमिळनाडूसह विविध राज्यांच्या आरोग्य व्यवस्थेचा अभ्यास करून महाराष्ट्रासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आयुष्मान आरोग्य मंदिर, क्रिटिकल केअर ब्लॉक आणि सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे.
ते पुढे म्हणाले की, शासकीय रुग्णालये म्हणजे अस्वच्छ किंवा निकृष्ट अशी नागरिकांची धारणा बदलणे आवश्यक आहे. शासनाच्या आरोग्य सेवांमध्ये स्वच्छता, गुणवत्ता आणि प्रभावी ब्रँडिंग असावे. मॉड्युलर तंत्रज्ञानामुळे आरोग्य प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणे शक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत राज्यातील नवीन १३ वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीचा आढावाही घेण्यात आला. प्रकल्पांमधील अडचणी तातडीने दूर करून कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्पांना शासनाने प्राधान्य दिले असून ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना अधिक सक्षम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी विविध स्तरांवर काम सुरू आहे.
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी माहिती दिली की, राज्यातील ५५ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे उन्नतीकरण करण्यात आले आहे. महानगरपालिका क्षेत्रात ११४१ तर नगरपालिका क्षेत्रात ७९७ नागरी आयुष्मान आरोग्य मंदिरे कार्यरत आहेत. या केंद्रांमधून लाखो नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात आल्या आहेत.
यावेळी एचपीव्ही लसीकरण मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. महाराष्ट्राला जवळपास दहा लाख मुलींच्या लसीकरणाचे उद्दिष्ट देण्यात आले असून व्यापक जनजागृती करून हे लक्ष्य वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0