मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवरांचे हुतात्मा चौकात अभिवादन; महाराष्ट्र देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथे हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. हुतात्म्यांच्या बलिदानातून घडलेला महाराष्ट्र आज देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई, दि. १ मे : महाराष्ट्राच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथे हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हुतात्म्यांच्या बलिदानातून घडलेला महाराष्ट्र आज देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनला आहे. महाराष्ट्र ही जगातील 30 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीतातील ओळी राज्याच्या ऐतिहासिक योगदानाची आठवण करून देतात. महाराष्ट्र दिन हा प्रत्येकासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे.
कामगार दिनानिमित्त शुभेच्छा
कामगार दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कामगारांना शुभेच्छा दिल्या. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, ‘पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर नाही, तर कामगाराच्या तळहातावर असते.’
राज्याच्या तसेच देशाच्या प्रगतीत कामगारांचा मोठा वाटा असून त्यांच्या श्रमांमुळेच संपन्नतेची उभारणी झाली आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्व कामगारांना अभिवादन केले.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0