बालभवनच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण; मुंबईत उभारणार मुक्त विज्ञान उद्यान
मुंबईतील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनच्या नूतनीकृत इमारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ‘मुक्त विज्ञान उद्यान’ उभारण्याची घोषणा करण्यात आली.
मुंबई, दि. २५ : मुंबईतील चर्नी रोड परिसरातील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनच्या नूतनीकृत इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी जवाहर बालभवन परिसरात ‘मुक्त विज्ञान उद्यान’ उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.
लोकार्पणानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालभवन अधिक सक्षम करण्यावर भर दिला. महानगरपालिका शाळांमधील अधिकाधिक विद्यार्थ्यांना या केंद्राशी जोडण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कौशल्य, रोजगार आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार दीपक केसरकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, बालभवन संचालक नीता पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बालभवनसारख्या संस्था विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि सर्जनशील विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. नव्या सुविधा आणि विज्ञान उद्यानामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रयोगशीलता आणि नवकल्पनांचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होईल.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बालभवन ही केवळ इमारत नसून लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. बालभवन गेली ७५ वर्षे मुलांना खेळ, संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला आणि विविध सृजनशील उपक्रमांशी जोडण्याचे कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, ४ ते १६ वयोगटातील मुलांच्या कल्पनाशक्ती आणि सृजनशीलतेला चालना देण्यासाठी ही संस्था सातत्याने कार्यरत आहे.
नूतनीकरण झालेल्या इमारतीतील सुविधा :
तळमजल्यावर अत्याधुनिक प्रेक्षकगृह
सुसज्ज ग्रंथालय
पहिल्या मजल्यावर नृत्य दालन
संगीत कक्ष आणि नाट्य कक्ष
दुसऱ्या मजल्यावर चित्रकला आणि मूर्तिकला दालने
विद्यार्थ्यांच्या सादरीकरणासाठी स्वतंत्र व्यासपीठ
१०० विद्यार्थी क्षमतेची तीन आधुनिक सभागृहे
या नव्या सुविधांमुळे एकाचवेळी ५०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देता येणार असून दरमहा सुमारे १० हजार आणि वर्षभरात जवळपास १ लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक बालभवन सुरू करण्याचा मानस शालेय शिक्षण विभागाचा असल्याचेही मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले.
यावेळी सर जे. जे. कला महाविद्यालय आणि महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. बालभवन संचालक नीता पाटील, सर जे. जे. कला महाविद्यालयाचे संचालक किशोर इंगळे आणि कुलसचिव शशिकांत काकडे यांच्या उपस्थितीत कराराच्या प्रतींचे आदानप्रदान करण्यात आले.
या करारामुळे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कला प्रशिक्षण आणि मार्गदर्शन उपलब्ध होण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0