जेजुरीचा ‘हळद भंडारा’ आता कायद्याच्या चौकटीत; शुद्धता आणि सुरक्षिततेसाठी विशेष धोरण
जेजुरीतील प्रसिद्ध ‘हळद भंडारा’ आता अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष नियमनाखाली येणार आहे. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शुद्धता, सुरक्षितता आणि पारदर्शकतेसाठी विशेष धोरण तयार करण्याचे निर्देश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत.
मुंबई : जेजुरी गडकोटावर उधळला जाणारा प्रसिद्ध ‘हळद भंडारा’ आता कायदेशीर चौकटीत आणण्याचा निर्णय अन्न व औषध प्रशासन विभागाने घेतला आहे. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शुद्धता, सुरक्षितता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.
काही काळापूर्वी जेजुरी गडकोटावर भंडारा उधळल्यामुळे आग लागल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर विधानसभेत लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर भंडाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी आणि नियमनासाठी विशेष बैठक घेण्यात आली.
या बैठकीला आमदार विक्रम पाचपुते, आमदार महेश शिंदे, आमदार राजू नवघरे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरजकुमार, आयुक्त श्रीधर डुबे पाटील आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत देवस्थान परिसरात विकला जाणारा ‘हळद भंडारा’ शुद्ध हळदीच्या स्वरूपातच उपलब्ध असावा, तसेच विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत आवश्यक अन्न परवाना घेऊनच विक्री करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. त्यामुळे भेसळयुक्त भंडारा विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे शक्य होणार आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून, जेजुरी नगरपरिषद आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. मंदिर परिसरात भंडाऱ्याच्या वापरासंदर्भात सुरक्षिततेचे नियम लागू करण्यात येतील. तसेच भाविकांना शुद्ध भंडाऱ्याची ओळख पटावी यासाठी माहितीफलक लावण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाकडून विशेष तपासणी मोहीमही राबविण्यात येणार आहे.
कायदेशीर दृष्टिकोनातून ‘भंडारा’ या संकल्पनेचे वर्गीकरणही महत्त्वाचे ठरणार आहे. सामान्यतः ‘भंडारा’ म्हणजे मोफत अन्न वितरण मानले जाते. मात्र जेजुरीमध्ये ‘हळद भंडारा’ धार्मिक विधी आणि प्रसाद म्हणून वापरला जात असल्याने त्यासाठी स्वतंत्र नियमनाची गरज असल्याचे प्रशासनाचे मत आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, “जेजुरी हे महाराष्ट्राचे सुवर्ण मंदिर आहे. येथील भंडाऱ्याची शुद्धता राखणे ही आमची जबाबदारी आहे. भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान राखत त्यांना सुरक्षित आणि शुद्ध हळद भंडारा मिळावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
या निर्णयामुळे जेजुरीतील हळद भंडाऱ्याला कायदेशीर ओळख मिळणार असून, देवस्थान परिसरात भेसळ रोखण्यासाठी हे एक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.
What's Your Reaction?
Like
3
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0