Title: कोकण कट्टा तर्फे ‘माणुसकीची भिक्षा फेरी’; गरजूंना प्रेमाचा घास, साई आधार संस्थेला दोन हजार किलो तांदूळ व डाळींचे वाटप

विलेपार्ले येथील कोकण कट्टा संस्थेने ‘माणुसकीची भिक्षा फेरी’ या उपक्रमातून विरारच्या साई आधार संस्थेला २ हजार किलो तांदूळ, २०० किलो डाळ तसेच विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला.

Jun 8, 2026 - 14:49
 0  39
Title: कोकण कट्टा तर्फे ‘माणुसकीची भिक्षा फेरी’; गरजूंना प्रेमाचा घास, साई आधार संस्थेला दोन हजार किलो तांदूळ व डाळींचे वाटप
माणुसकीची भिक्षा फेरी : कोकण कट्टाकडून साई आधार संस्थेला २ हजार किलो तांदूळ व डाळींची मदत

मुंबई | प्रतिनिधी - मिलिंद कारेकर

विलेपार्ले येथील कोकण कट्टा या सेवाभावी संस्थेच्या वतीने ‘माणुसकीची भिक्षा फेरी’ हा सामाजिक उपक्रम राबवून विरारच्या भाताणे परिसरातील साई आधार या निराधारांसाठी कार्यरत संस्थेला मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत संस्थेला तब्बल दोन हजार किलो तांदूळ, दोनशे किलो डाळ तसेच मुलांसाठी बिस्किटे, फरसाण, केक, वॉटर बॉटल आणि उत्कृष्ट दर्जाचे पेन देण्यात आले.

या उपक्रमासाठी कोकण कट्टाने नागरिकांना ‘एक किलो तांदूळ आणि एक किलो डाळ’ दान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर नागरिकांनी सढळ हस्ते मदत केली. तांदूळ व डाळींसोबतच इतर आवश्यक साहित्यही मोठ्या प्रमाणात देणगी स्वरूपात जमा झाले. नागरिकांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे उपक्रमाला ‘माणुसकीची भिक्षा फेरी’ असे नाव देण्यात आले.

गरजूंना मदतीचा हात देत प्रेमाचा घास भरवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विलेपार्ले येथील श्री स्वामी समर्थ मठाचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.

साई आधार संस्थेच्या विरार येथील निवासस्थानी जाऊन कोकण कट्टा संस्थापक अजित पितळे, दादा गावडे, सुजित कदम, प्रभाकर फणसेकर, जयेश बंदरकर, सचिन दिवाळे, राजू चव्हाण आणि आत्माराम डिके यांच्यासह अन्य सदस्यांनी सेवाकार्यात सक्रिय सहभाग घेतला.

याशिवाय ग्राम संवर्धन पेण आणि मोखाडा येथील सह्याद्री संस्थांनाही आणखी धान्य मदत देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

कोकण कट्टा संस्थापक अजित पितळे, अध्यक्ष विवेक वैद्य तसेच साई आधार संस्थेचे विशाल परुळेकर यांनी या उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांना समाधानाची अनुभूती मिळाली. समाजातील गरजूंना मदतीचा हात देत माणुसकीची जपणूक करण्याचा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0