‘महाचतुर एआय चॅटबॉट’चे लोकार्पण; कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि उद्योजकता एकाच व्यासपीठावर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाचतुर एआय चॅटबॉट’चे लोकार्पण करण्यात आले. युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन आणि शिकाऊ उमेदवारी नोंदणीसाठी हे एकाच ठिकाणी डिजिटल व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
मुंबई : राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या ‘महाचतुर एआय चॅटबॉट’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून विकसित करण्यात आलेला हा देशातील राज्य शासनाचा पहिलाच अभिनव एआय आधारित उपक्रम असल्याचे सांगण्यात आले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, राज्य नाविन्यता सोसायटीचे आयुक्त डॉ. अमित सैनी, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी तसेच विविध उद्योग, शैक्षणिक संस्था आणि आंतरराष्ट्रीय भागीदार उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतातील ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे. ही युवा शक्ती देशाच्या विकासासाठी मोठी संधी असून त्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ हवे आहे आणि युवकांना रोजगार हवा आहे. या दोघांमध्ये प्रभावी दुवा निर्माण करण्याचे काम ‘महाचतुर एआय चॅटबॉट’ करणार आहे.
हा चॅटबॉट कौशल्य प्रशिक्षण, रोजगार संधी, उद्योजकता मार्गदर्शन, अर्ज प्रक्रिया, असेसमेंट, मार्केट लिंकेज आदी सेवा वन-स्टॉप सोल्युशन म्हणून उपलब्ध करून देणार आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तो सर्वांसाठी सहज उपलब्ध राहणार आहे.
शिकाऊ उमेदवारी क्षेत्रातही या उपक्रमामुळे मोठा बदल होणार आहे. राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (NAPS) आणि महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (MAPS) अंतर्गत उमेदवारांची नोंदणी पूर्वी दोन ते तीन दिवस लागत होती, ती आता केवळ १५ मिनिटांत पूर्ण होणार आहे.
ही प्रणाली पूर्णपणे शासकीय सर्व्हरवर आधारित असून डेटा सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील युवकांना प्रशिक्षणापासून प्लेसमेंटपर्यंत सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील असंघटित कौशल्य क्षेत्राला एकत्र आणून महाराष्ट्राला अधिक सक्षम करण्यासाठी विभाग कार्यरत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे काही नोकऱ्यांवर परिणाम होईल, मात्र त्याचवेळी मोठ्या प्रमाणात नवीन रोजगार संधीही निर्माण होतील.
या कार्यक्रमात विविध ज्ञान आणि उद्योग क्षेत्रातील भागीदार संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण, डेटा सुरक्षितता, कैद्यांना कौशल्य प्रशिक्षण, युवकांसाठी रोजगार संधी आणि कौशल्य विकास क्षेत्रात सहकार्य केले जाणार आहे.
यावेळी उत्कृष्ट आस्थापना, उद्योग भागीदार आणि नियोक्त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जर्मनीमध्ये अॅप्रेंटिसशिपसाठी निवड झालेल्या सहा आयटीआय विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात अॅप्रेंटिसशिप, एआय आणि सार्वजनिक सेवा वितरण या विषयांवर पॅनल चर्चाही आयोजित करण्यात आल्या.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0