मानव एकता दिनानिमित्त पिंपरीत भव्य रक्तदान शिबिर; ७१० युनिट रक्त संकलन

संत निरंकारी मिशनतर्फे मानव एकता दिनानिमित्त पिंपरीतील काळेवाडीत आयोजित रक्तदान शिबिरात ७१० युनिट रक्त संकलित करण्यात आले. प्रेम, करुणा आणि मानवसेवेचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.

Apr 26, 2026 - 03:39
Apr 26, 2026 - 03:52
 0  1
मानव एकता दिनानिमित्त पिंपरीत भव्य रक्तदान शिबिर; ७१० युनिट रक्त संकलन
संत निरंकारी मिशन, पिंपरी रक्तदान शिबिर

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

काळेवाडी, पिंपरी, दि. २५ एप्रिल २०२६ : संत निरंकारी मिशनतर्फे मानव एकता दिनानिमित्त काळेवाडी, पिंपरी येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल ७१० युनिट रक्त संकलित करण्यात आले.

मानव एकता दिवस युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंहजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशभरातील हजारो सत्संग केंद्रांवर श्रद्धा आणि समर्पण भावनेतून साजरा करण्यात आला. प्रेम, करुणा, सद्भावना आणि निष्काम सेवेचा संदेश देणारा हा दिवस सर्वत्र उत्साहात पार पडला.

पिंपरीतील रक्तदान शिबिरात यशवंतराव रुग्णालय रक्तपेढी, ससून रुग्णालय रक्तपेढी तसेच संत निरंकारी रक्तपेढीच्या डॉक्टर व सहकाऱ्यांनी रक्तदात्यांची तपासणी करून सुरक्षित आणि सुव्यवस्थित पद्धतीने रक्तदान प्रक्रिया पूर्ण केली. संपूर्ण आयोजनात स्वच्छता, सतर्कता आणि सेवाभावाला विशेष प्राधान्य देण्यात आले.

या कार्यक्रमाला आमदार शंकर जगताप, महापौर रवीभाऊ लांडगे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्यासह अनेक नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मिशनच्या कार्याचे कौतुक केले.

संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखीजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरात सुमारे २१२ ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली असून, त्यातून जवळपास ४० हजार युनिट रक्त संकलित करण्यात आले.

मागील चार दशकांपासून ही रक्तदानाची परंपरा अखंड सुरू असून, आतापर्यंत ९,१७४ रक्तदान शिबिरांतून १५,००,२३० युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. मानवसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा हा आदर्श उपक्रम असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0