बीडीडी चाळ आणि कन्नमवार नगर पुनर्विकास प्रकल्पांची संजीव जयस्वाल यांच्याकडून पाहणी; कामांच्या गुणवत्तेचा घेतला आढावा

म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी वरळी, ना. म. जोशी मार्ग, नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प तसेच विक्रोळीतील कन्नमवार नगर प्रकल्पाची पाहणी करून बांधकाम प्रगतीचा आढावा घेतला. रहिवाशांशी संवाद साधत त्यांनी प्रकल्प वेळेत आणि उच्च दर्जाने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

May 15, 2026 - 01:49
 0  7
बीडीडी चाळ आणि कन्नमवार नगर पुनर्विकास प्रकल्पांची संजीव जयस्वाल यांच्याकडून पाहणी; कामांच्या गुणवत्तेचा घेतला आढावा

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) बीडीडी चाळ आणि कन्नमवार नगर पुनर्विकास प्रकल्पांच्या कामांची म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी बुधवारी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी वरळी, ना. म. जोशी मार्ग, नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प तसेच विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवार नगर प्रकल्पातील बांधकाम प्रगतीचा आढावा घेतला.

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ५५६ पुनर्वसन सदनिकांचे वितरण करण्यात आले आहे. पाहणीदरम्यान जयस्वाल यांनी तीन लाभार्थ्यांच्या घरी भेट देत रहिवाशांशी संवाद साधला. नव्या सदनिकांचा दर्जा, प्रशस्त रचना, स्वच्छ परिसर आणि आधुनिक सुविधा याबाबत रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.

अनेक वर्षे जुन्या आणि मर्यादित जागेत राहिल्यानंतर आता मुंबईच्या मध्यवर्ती भागात सुरक्षित व सुसज्ज २ बीएचके घर मिळाल्याचा आनंद रहिवाशांनी व्यक्त केला. नव्या घरांमुळे मुलांना अभ्यासासाठी स्वतंत्र जागा, महिलांसाठी सुरक्षित वातावरण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक सुविधा उपलब्ध झाल्याचे रहिवाशांनी सांगितले.

स्थानिक नागरिकांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी म्हाडा प्रशासनाने घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. पुनर्वसन प्रक्रियेदरम्यान प्रशासनाने सातत्याने संवाद साधून नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्याबद्दलही समाधान व्यक्त करण्यात आले.

यानंतर जयस्वाल यांनी ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पांची पाहणी केली. नायगाव प्रकल्पातील एका लाभार्थ्याच्या घरी भेट देऊन त्यांनी नागरिकांशी चर्चा केली.

पाहणी दौऱ्यात जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व कामे निश्चित मुदतीत आणि उच्च गुणवत्तेच्या निकषांनुसार पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी तातडीने सोडवून प्रकल्पांमध्ये कोणताही विलंब होऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुनर्विकास प्रकल्पांमध्ये नागरिककेंद्री दृष्टीकोन कायम ठेवण्यावर भर देत रहिवाशांना कामांच्या प्रगतीबाबत नियमित माहिती द्यावी तसेच त्यांच्या तक्रारी आणि सूचनांचे पारदर्शक व वेळबद्ध पद्धतीने निराकरण करावे, असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

या पाहणी दौऱ्यात मुख्य अभियंता-२ महेश जेसवानी, मुख्य अभियंता-३ सुनील ननावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, सहमुख्य अधिकारी वंदना सूर्यवंशी, उपमुख्य अभियंता अनिल अंकलगी, उपमुख्य अभियंता सुनील भडांगे, कार्यकारी अभियंता नीलेश सूर्यवंशी यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0