मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे 3 जून रोजी होणाऱ्या कार्यकारी समिती बैठकीत त्या पदाची सूत्रे स्वीकारणार असून त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.

Jun 2, 2026 - 22:32
 0  14
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड
रितू तावडे, मुंबई महापौर, अखिल भारतीय महापौर परिषद

मुंबई, प्रतिनिधी दि. 2 : मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे 3 आणि 4 जून 2026 रोजी होणाऱ्या अखिल भारतीय महापौर परिषदेच्या 117 व्या कार्यकारी समिती बैठकीत त्या उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

ऋषिकेश येथे 3 जून रोजी सकाळी 10 वाजता होणाऱ्या कार्यकारी समितीच्या प्रमुख बैठकीचा शुभारंभ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते होणार आहे. या बैठकीस केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्री मनोहर लाल खट्टर तसेच उत्तराखंडचे नागरी विकास मंत्री रामसिंह केडा यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

देशभरातील विविध महानगरांचे महापौर तसेच उत्तराखंड राज्यातील सर्व महापौर या बैठकीत सहभागी होणार आहेत. अखिल भारतीय महापौर परिषदेच्या सर्व सदस्यांनी श्रीमती रितू तावडे यांच्या नावावर एकमत दर्शविल्यानंतर कार्यकारी समितीच्या बैठकीत त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र महापौर परिषदेच्या पदसिद्ध अध्यक्ष म्हणूनही श्रीमती तावडे यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. त्यानंतर आता राष्ट्रीय स्तरावरील या महत्त्वाच्या पदावर त्यांची निवड झाल्याने मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

अखिल भारतीय महापौर परिषद ही 1962 पासून कार्यरत असलेली देशातील महत्त्वाची संस्था असून तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. सध्या देशभरातील सुमारे 240 महापौर या परिषदेचे सदस्य आहेत. कार्यकारी समितीत 60 सदस्यांचा समावेश असतो.

कर्नाल (हरियाणा) शहराच्या महापौर रेणुबाला गुप्ता या सप्टेंबर 2025 पासून परिषदेच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. महापौरांच्या अधिकार, कर्तव्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समस्या, लोकाभिमुख प्रशासन आणि शासनस्तरीय पाठपुरावा यांसारख्या विषयांवर अखिल भारतीय महापौर परिषद महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते.

रितू तावडे यांच्या निवडीमुळे मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्राला राष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1