थेरगावमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेची मोठी कारवाई; १,८५८ चौरस मीटर क्षेत्रावरील ३० अनधिकृत बांधकामे हटवली

पिंपरी चिंचवड महापालिकेने थेरगाव येथील लेमनट्री हॉटेल ते मोरया बॅन्क्वेट हॉल दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी ३० ठिकाणांवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. या मोहिमेत १,८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रावरील अतिक्रमणे हटविण्यात आली.

Jun 4, 2026 - 19:25
 0  3
थेरगावमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेची मोठी कारवाई; १,८५८ चौरस मीटर क्षेत्रावरील ३० अनधिकृत बांधकामे हटवली
थेरगाव येथे रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर करण्यात आलेली निष्कासन कारवाई.

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी, दि. २ जून २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने थेरगाव परिसरातील रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी मोठी निष्कासन कारवाई करत ३० ठिकाणांवरील अनधिकृत बांधकामे हटवली. या कारवाईत एकूण १ हजार ८५८.२५ चौरस मीटर क्षेत्रावरील अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली.

महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक २४ मधील मौजे थेरगाव येथे लेमनट्री हॉटेल ते मोरया बॅन्क्वेट हॉल दरम्यान सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण प्रकल्पासाठी ही मोहीम राबविण्यात आली. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत करण्यात आलेल्या या कारवाईमुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे.

महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप यांच्या अधिपत्याखाली ही कारवाई पार पडली.

या मोहिमेत उपअभियंता सुनील बेळगावकर आणि जयवंत रोकडे यांच्यासह महापालिकेच्या धडक कारवाई पथकातील ‘ब’, ‘ड’ आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयांचे १४ बीट निरीक्षक सहभागी झाले होते. याशिवाय ४० महाराष्ट्र सुरक्षा दल (एमएसएफ) जवान, एक पोलीस उपनिरीक्षक, ९ पोलीस कर्मचारी, १० कंत्राटी मजूर आणि ७ मजूर कर्मचारी यांची मदत घेण्यात आली.

कारवाईसाठी ५ जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात आला. तसेच शहरी दळणवळण विभाग, विद्युत विभाग, नगररचना विभाग आणि इतर संबंधित विभागांचे सहकार्य लाभले.

याबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, “शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, सुकर आणि गतिमान करण्यासाठी रस्ता रुंदीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या कामांमध्ये अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे नियमानुसार हटविण्यात येत आहेत. नागरिकांच्या व्यापक हितासाठी आणि शहराच्या नियोजित विकासासाठी अशा कारवाया आवश्यक असून सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे.”

ते पुढे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून विकासकामांमध्ये अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पुढेही कारवाई सुरू राहणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0