अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व पूरनियंत्रण प्रकल्पांना १,२९० कोटींची केंद्र शासनाकडून मंजुरी
भारत सरकारच्या अर्बन चॅलेंज फंड अंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या १२ गावांसाठीच्या पाणीपुरवठा प्रकल्पास ८९० कोटी आणि पूरनियंत्रण उपाययोजनांसाठी ४०० कोटी अशा एकूण १,२९० कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पुणे, दि. ११ मे २०२६ :
शहरी विकासाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या ‘अर्बन चॅलेंज फंड’ (UCF) अंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांना केंद्र शासनामार्फत मोठी मंजुरी मिळाली आहे. गृहविकास व शहरी व्यवहार मंत्रालय, भारत सरकार यांच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पहिल्या Apex Committee बैठकीत पुणे शहरातील पाणीपुरवठा आणि पूरनियंत्रण प्रकल्पांना एकूण १,२९० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.
यामध्ये १२ गावांसाठीच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी ८९० कोटी रुपये तर पुणे शहरातील पूरनियंत्रण उपाययोजनांसाठी ४०० कोटी रुपयांच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.
१२ गावांसाठी ८९० कोटींचा पाणीपुरवठा प्रकल्प
पुणे महानगरपालिकेच्या जुन्या हद्दीतील समान पाणीपुरवठा योजनेचे सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून संपूर्ण प्रकल्प ऑगस्ट २०२६ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. सध्या ७ गावांमध्ये पाणीपुरवठा कामे प्रगतीपथावर असून २५ गावांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे.
Guillain-Barré Syndrome (GBS) बाधित खडकवासला, नांदेड, नांदोशी, सनसनगर, किरकीटवाडी, धायरी, नऱ्हे, जांभूळवाडी, कोल्हेवाडी, मांगडेवाडी, निंबाळकरवाडी आणि भिलारवाडी या १२ गावांसाठी हा विशेष पाणीपुरवठा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.
या प्रकल्पाअंतर्गत २०० MLD जलशुद्धीकरण प्रकल्प, ७१ किलोमीटर ट्रान्समिशन मेन लाईन, ३९० किलोमीटर वितरण व्यवस्था तसेच SCADA आणि AMR आधारित स्मार्ट मीटरिंग प्रणाली उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून सन २०५२ पर्यंत सुमारे ७.७८ लाख नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
पूरनियंत्रण उपाययोजनांसाठी ४०० कोटींचा प्रकल्प
पुणे शहरातील ३३५ महत्त्वाच्या पूरग्रस्त ठिकाणी पावसाळी जलनिस्सारण उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. या सर्वसमावेशक उपक्रमामुळे नागरिक आणि त्यांच्या मालमत्तेचे संरक्षण होण्यास तसेच सार्वजनिक आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे.
SCADA आधारित स्मार्ट जलव्यवस्थापन तसेच AMR/NRW नियंत्रण प्रणालीमुळे पाणीगळती कमी होऊन २०५२ पर्यंत पुणे शहरात सक्षम, शाश्वत आणि आधुनिक पाणी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे पुणे महानगरपालिकेचे लक्ष्य आहे.
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे पुणे महानगरपालिका शहरातील नागरी सुविधांचे सर्वांगीण संतृप्तीकरण साध्य करण्यासाठी कार्यरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री विशेष लक्ष देत असून त्यामुळे शहराच्या पायाभूत सुविधांना अधिक बळकटी मिळत असल्याचेही नमूद करण्यात आले.
या बैठकीत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रकल्पांचे सादरीकरण केले. त्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पवनीत कौर यांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे हे यश शक्य झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0