माहिती अधिकार हे भ्रष्टाचाराविरोधातील प्रभावी शस्त्र – ॲड. अजित बोराडे

दक्ष नागरिक संघाच्या माहिती अधिकार कार्यकर्ता मेळाव्यात ॲड. अजित बोराडे यांनी माहिती अधिकार कायदा हा भ्रष्टाचाराविरोधातील प्रभावी शस्त्र असल्याचे सांगत नागरिकांनी त्याचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले.

May 11, 2026 - 20:24
 0  5
माहिती अधिकार हे भ्रष्टाचाराविरोधातील प्रभावी शस्त्र – ॲड. अजित बोराडे
माहिती अधिकार कायदा, आरटीआय, अजित बोराडे, श्रीरंग बारणे, दक्ष नागरिक संघ,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे

पिंपरी-चिंचवड, दि. ११ मे : “माहिती अधिकार कायदा २००५ हे भ्रष्टाचाराविरोधातील सर्वसामान्यांच्या हातातील प्रभावी शस्त्र आहे. प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांनी या कायद्याचा प्रभावी वापर करावा,” असे प्रतिपादन सहकारतज्ज्ञ ॲड. अजित बोराडे यांनी केले.

दक्ष नागरिक संघ यांच्या वतीने चिंचवड येथील चैतन्य सभागृहात आयोजित माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या महामेळावा आणि पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले.

“माहिती अधिकारामुळे अधिकाऱ्यांचे उत्तरदायित्व वाढले”

ॲड. बोराडे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरही प्रशासकीय यंत्रणेचा दृष्टिकोन फारसा बदललेला नाही. सुशिक्षित व्यक्तींनाही शासकीय कार्यालयांत अनेक महिने चकरा माराव्या लागतात, तर अशिक्षित नागरिकांची अवस्था अधिक कठीण असते.

“माहिती अधिकार कायद्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांचे उत्तरदायित्व वाढते आणि त्यांच्या चुकीच्या निर्णयांवर प्रकाश पडतो. या कायद्यांतर्गत नागरिकांना केवळ कागदपत्रांची माहितीच नव्हे, तर रस्ते बांधकामासाठी वापरण्यात येणारे साहित्य, औषधांचे नमुने तपासण्याचाही अधिकार आहे,” असे त्यांनी सांगितले.

तसेच संबंधित कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष फाईल तपासणी करण्याची तरतूद असून पहिल्या तासासाठी ही तपासणी मोफत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

“माहिती अधिकारामुळे नागरिक सत्तेच्या केंद्रस्थानी”

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, माहिती अधिकार कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिक सत्तेच्या केंद्रस्थानी आला आहे. “कायद्याचे तांत्रिक ज्ञान नसतानाही एका अर्जाद्वारे प्रशासकीय त्रुटी उघड करणे शक्य झाले आहे. चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचे काम या कायद्याने केले आहे,” असे त्यांनी नमूद केले.

माहिती अधिकाराचा वापर विधायक कामांसाठी झाल्यास अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मदत होते. मात्र काही जण या कायद्याचा गैरवापर करून प्रामाणिक कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या कामातील आणि चारित्र्यातील स्वच्छता जपणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुरस्कार वितरण सोहळा

यावेळी खासदार बारणे यांच्या हस्ते संजीवन सांगळे यांना ‘सहकार भूषण’, डॉ. सोनाली गेडाम-नागदेवते यांना ‘विद्यारत्न’, तर सुरज साळवे यांना ‘पत्रकारिता भूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाला कामगार नेते इरफान सय्यद, नगरसेविका सुप्रिया चांदगुडे, नगरसेवक राजू बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर नागरगोजे, शांताराम कुंभार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. श्वेता मांडे-वैद्य यांनी केले. विनोद क्षीरसागर यांनी प्रस्ताविक तर निलेश हाके यांनी आभार मानले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0