संजय दिना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; भांडुप स्टेशन परिसरातील बेस्ट चौकीच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन
भांडुप रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या समस्येवर तोडगा निघाला असून खासदार संजय दिना पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर बेस्ट चौकी पर्यायी जागेवर हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या चौकीच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन पार पडले असून यामुळे स्टेशन परिसर अधिक मोकळा आणि सुरक्षित होणार आहे.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई, दि. ६ : भांडुप रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय आणि वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या समस्येवर अखेर तोडगा निघण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. खासदार संजय दिना पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर स्टेशन रोडच्या मध्यभागी असलेली बेस्ट बस चौकी पर्यायी जागेवर हलविण्याचा निर्णय घेण्यात आला असून तिच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले.
भांडुप रेल्वे स्थानक मार्गावरील बेस्ट चौकीमुळे अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी निर्माण होत होती. तसेच या परिसरात वारंवार अपघात होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. गतवर्षी झालेल्या भीषण अपघातात चार नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर या प्रश्नाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जाऊ लागले.
या पार्श्वभूमीवर खासदार संजय दिना पाटील यांनी प्रशासन, महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत चौकीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. डीपीडीसी बैठकींपासून प्रत्यक्ष पाहणीपर्यंत विविध स्तरांवर केलेल्या प्रयत्नांनंतर प्रशासनाने नव्या जागेची निवड केली असून खासदार निधीतून नव्या चौकीची उभारणी करण्यात येणार आहे.
स्टेशन परिसरातील अडथळे दूर होणार
नवीन चौकीचे काम पूर्ण झाल्यानंतर सध्या रस्त्याच्या मध्यभागी असलेली बेस्ट चौकी हटविण्यात येणार आहे. त्यामुळे स्टेशन परिसरातील अडथळे दूर होऊन पादचारी आणि वाहनचालकांना अधिक मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. याशिवाय, परिसरातील पोलीस बीट चौकीही लवकरच पर्यायी जागेवर स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती संजय दिना पाटील यांनी दिली.
मान्यवरांची उपस्थिती
भूमिपूजन कार्यक्रमाला रमेश कोरगावकर, सुरेश शिंदे, दिपमाला बडे, राजोल संजय पाटील, नितीन चव्हाण, अर्जुन मांजरेकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांकडून समाधान व्यक्त
स्टेशन परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी खासदार संजय दिना पाटील यांचे आभार मानले. या निर्णयामुळे भांडुपकरांच्या दैनंदिन प्रवासातील मोठा अडथळा दूर होणार असून वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0