सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रति आखाडा ५ कोटींचा निधी; भव्य आयोजनासाठी सरकार कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रत्येक आखाड्यास ५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कुंभमेळ्याच्या भव्य आयोजनासाठी सरकार निधी कमी पडू देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

May 14, 2026 - 04:37
May 14, 2026 - 04:49
 0  5
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रति आखाडा ५ कोटींचा निधी; भव्य आयोजनासाठी सरकार कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सिंहस्थ कुंभमेळा, नाशिक कुंभमेळा, त्र्यंबकेश्वर, देवेंद्र फडणवीस

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी महत्त्वपूर्ण घोषणा करत प्रत्येक आखाड्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच छोट्या संस्थानांसाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून आखाड्यांच्या वीज देयकाची भरपाई प्राधिकरणामार्फत केली जाईल. याशिवाय शासकीय कामासाठी आखाड्यांची जमीन अधिग्रहित केल्यास संबंधितांना मोबदला किंवा पर्यायी जमीन देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, उद्योग मंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्रासाठी सेवेचा आदर्श निर्माण करण्याची मोठी संधी आहे. साधू, महंत आणि भाविकांच्या मार्गदर्शनातून कुंभमेळ्याचे भव्य-दिव्य आयोजन करण्यात येणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याचे नियोजन हे केवळ एका मेळ्यासाठी नसून पुढील १२ वर्षांचा विचार करून करण्यात येत आहे. त्यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात कायमस्वरूपी विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे.

त्र्यंबकेश्वर हे देशातील अत्यंत महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असल्याचे सांगत त्यांनी मंदिर परिसरात कॉरिडॉर उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. यामुळे भाविकांना अधिक सुविधा मिळणार आहेत. तसेच नाशिकमधील रामकुंड, रामकाल पथ, मंदिरे आणि गुफांचा जीर्णोद्धार करण्यात येत असून संपूर्ण परिसरात अध्यात्मपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

कुंभमेळ्याच्या निमित्ताने आरोग्य व्यवस्थेचाही मोठा आराखडा तयार करण्यात आला असून साधू, महंत आणि भाविकांना कोणतीही आरोग्यविषयक अडचण येऊ नये यासाठी व्यापक उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच गोदावरी नदी अधिक स्वच्छ आणि निर्मळ ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुंभमेळ्याच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगत सुरक्षा व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट केले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0