उन्नत नाशिक अभियानाला गती; कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 35 हजार कोटींच्या विकासकामांना चालना

नाशिकच्या सर्वांगीण, शाश्वत आणि नियोजनबद्ध विकासासाठी ‘उन्नत नाशिक अभियान’ राबविण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली. आगामी कुंभमेळा लक्षात घेता पायाभूत सुविधा, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, वाहतूक व गर्दी व्यवस्थापनासाठी 35 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांना गती देण्यात येणार आहे.

May 1, 2026 - 22:30
 0  4
उन्नत नाशिक अभियानाला गती; कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 35 हजार कोटींच्या विकासकामांना चालना
उन्नत नाशिक अभियान, Girish Mahajan

नाशिक, प्रतिनिधी: नाशिक शहराचा सर्वांगीण, शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी ‘उन्नत नाशिक अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात येणार असून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि गर्दी व्यवस्थापनाला प्राधान्य देण्यात येत आहे, असे प्रतिपादन जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

महाकवी कालिदास कलामंदिर येथे नाशिक महानगरपालिकेतर्फे आयोजित ‘उन्नत नाशिक अभियान’ कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, उपमहापौर विलास शिंदे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्रदीप चौधरी, विविध उद्योग संघटनांचे पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित होते.

मंत्री महाजन म्हणाले की, नाशिक हे ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा लाभलेले शहर असून गोदावरी नदी व रामकुंडामुळे देश-विदेशात ओळखले जाते. कुंभमेळ्यात लाखो भाविक येत असल्याने सुरक्षित, स्वच्छ आणि सुव्यवस्थित व्यवस्था उभारणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.

गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या योजना राबविण्यात येत असून सांडपाणी प्रक्रिया करून स्वच्छ पाणी नदीत सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठीही विशेष उपाययोजना सुरू आहेत.

नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे 35 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून या निधीतून 17 पूल उभारले जाणार आहेत. प्रमुख रस्त्यांचे व्हाईट टॉपिंग करण्यात येणार असून शहरातील खड्ड्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय केला जाणार आहे.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी 8 हजार कोटी रुपयांचा रिंगरोड प्रकल्प वेगाने सुरू असून तो पूर्ण झाल्यानंतर उद्योग, व्यापार आणि गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कुंभमेळ्याच्या काळात रेल्वे स्थानक, विमानतळ, पार्किंग सुविधा, वाहतूक व्यवस्थेचा विस्तार आणि स्नानस्थळांवर विशेष नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. “हरित नाशिक” संकल्पनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जाणार असून झाडांच्या संगोपनालाही प्राधान्य दिले जाणार आहे.

मंत्री महाजन यांनी नागरिकांना “माझे शहर – माझी जबाबदारी” या भावनेतून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक शिस्तीत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.

महापौरांचा सहभागासाठी संदेश

महापौर हिमगौरी आडके-आहेर यांनी सांगितले की, स्वच्छता, हरितकरण, सौंदर्यीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आणि युवकांचा सहभाग या अभियानासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

पुलाचे अभासी उद्घाटन

गंगापूर रोड ते गोदावरी नदी जोडणाऱ्या 30 मीटर रुंदीच्या डीपी रस्त्यावरील पुलाचे अभासी उद्घाटन मंत्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

पर्यावरण व समाजसेवा क्षेत्रातील सन्मान

पर्यावरण संवर्धन, नदी स्वच्छता, जनजागृती आणि समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कामगार दिनानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव

कामगार दिनानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच “आजची स्वच्छता, उद्याची सुरक्षितता” या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0