वरळीतील भाजपा मोर्चातील आयोजकांसह मंत्री-नेत्यांवरही गुन्हे दाखल करा; सुरेशचंद्र राजहंस यांची मागणी

वरळीतील भाजपा मोर्चामुळे वाहतूक कोंडी व नागरिकांना त्रास झाल्याचा आरोप करत आयोजकांसह सहभागी मंत्री आणि नेत्यांवरही गुन्हे दाखल करण्याची मागणी मुंबई काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे. मोर्चावर संताप व्यक्त करणाऱ्या महिलेचे सोशल मीडियावर चारित्र्यहनन होत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

Apr 24, 2026 - 18:24
 0  14
वरळीतील भाजपा मोर्चातील आयोजकांसह मंत्री-नेत्यांवरही गुन्हे दाखल करा; सुरेशचंद्र राजहंस यांची मागणी
वरळी भाजपा मोर्चा, सुरेशचंद्र राजहंस, मुंबई काँग्रेस

मुंबई- प्रतिनिधी उदय कासारे 

  दि. २४ एप्रिल वरळी भागात भारतीय जनता पक्षाने महिला आरक्षणाच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चावरून आता राजकीय वातावरण तापले आहे. या मोर्चामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला असून आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, फक्त आयोजकांवर कारवाई करून चालणार नाही, तर या मोर्चात सहभागी झालेल्या भाजपाच्या मंत्री, आमदार आणि नेत्यांवरही गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस यांनी केली आहे.

राजहंस म्हणाले की, कोणताही मोर्चा किंवा आंदोलन काढण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते. विरोधी पक्षांच्या आंदोलनांना परवानगी देताना अनेक अटी व शर्थी लादल्या जातात, तर सत्ताधारी पक्षाच्या मोर्चाला अवघ्या दोन दिवसांत परवानगी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. सत्ताधाऱ्यांसाठी वेगळे नियम आणि विरोधकांसाठी वेगळे नियम अशी पद्धत धोकादायक असल्याची टीकाही त्यांनी केली.

काँग्रेसने यापूर्वी आंदोलने केल्यावर आयोजकांसह सहभागी नेत्यांवरही गुन्हे दाखल झाले होते. मग वरळी मोर्चाप्रकरणी फक्त आयोजकांवरच गुन्हा का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पोलिसांनी कायद्याने काम करावे, राजकारण करू नये, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, या मोर्चामुळे वरळी परिसरात दोन तासांहून अधिक काळ वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांचा फौजफाटा वाहतूक सुरळीत करण्याऐवजी मंत्र्यांच्या सुरक्षेत व्यस्त असल्याची टीकाही करण्यात आली.

मोर्चादरम्यान एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर संताप व्यक्त केला होता. त्या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर भाजपाचा आयटी सेल आणि समर्थकांकडून संबंधित महिलेचे चारित्र्यहनन करण्यात येत असल्याचा आरोप राजहंस यांनी केला. महिला आरक्षणासाठी मोर्चा काढणाऱ्या भाजपाचा महिलांबद्दलचा हा दुटप्पीपणा असल्याची टीका त्यांनी केली.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0