वरळी जेट्टी विकासाला गती; जलवाहतूक, वॉटर अॅम्ब्युलन्स आणि हेलिपॅड सुविधांवर भर
मुंबईतील वरळी जेट्टी विकास प्रकल्पाला गती देण्यात आली असून जलवाहतूक, वॉटर अॅम्ब्युलन्स, आपत्कालीन सेवा आणि हेलिपॅड सुविधा विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली.
मुंबई, दि. २५ : मुंबईतील सागरी वाहतूक अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलत वरळी जेट्टीच्या नियोजित विकासाला गती दिली आहे. या प्रकल्पामुळे जलवाहतूक, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, पर्यटन आणि किनारी भागातील संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.
मंत्रालयात आयोजित बैठकीत वरळी जेट्टी विकास आराखड्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामादरम्यान अमरसन्स गार्डन इंटरचेंज आणि वरळी डेअरी परिसरात बांधकाम साहित्य वाहतुकीसाठी तात्पुरत्या जेट्टी उभारण्यात आल्या होत्या. आता कोस्टल रोड प्रकल्प पूर्णत्वाकडे जात असताना या जेट्टींचा वापर जलवाहतूक, सार्वजनिक वाहतूक, वॉटर अॅम्ब्युलन्स आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी करण्याचा विचार सुरू आहे.
या संदर्भात महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत आयआयटी मुंबईकडून संरचनात्मक तपासणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात आली आहे. अहवालानुसार अमरसन्स परिसरातील जेट्टी प्रवासी वाहतुकीसाठी योग्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र वरळी डेअरी परिसरातील जेट्टीमध्ये आवश्यक तांत्रिक बदल केल्यानंतर ती जलवाहतूक आणि आपत्कालीन सेवांसाठी वापरता येऊ शकते, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
या प्रकल्पासाठी प्री-फिजिबिलिटी रिपोर्ट, सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर), पर्यावरणीय परवानग्या आणि इतर तांत्रिक मंजुरी प्रक्रियेवरही काम सुरू आहे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) नियुक्ती प्रक्रियाही अंतिम टप्प्यात पोहोचली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
याशिवाय वरळी जेट्टी परिसरात सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर हेलिपॅड विकसित करण्यासाठी इच्छुक संस्थांकडून ‘एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट’ मागविण्यात आले आहेत.
मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, "मुंबईतील सागरी वाहतूक अधिक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. वरळी जेट्टी विकास प्रकल्प वाहतुकीपुरता मर्यादित नसून पर्यटन, आपत्कालीन सेवा आणि किनारी भागांमधील संपर्क सुधारण्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरणार आहे."
यावेळी मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी वरळी जेट्टी विकासासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाला महानगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल, असे स्पष्ट केले.
मुंबईतील वाढत्या वाहतूक ताणाच्या पार्श्वभूमीवर सागरी वाहतुकीला पर्याय म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0