स्क्रीनवर नव्हे, विचारांनी स्मार्ट व्हा; स्वतःची ताकद ओळखा’ – आमदार अमित गोरखे यांचे युवकांना प्रेरणादायी आवाहन
सकाळ माध्यम समूह आयोजित ‘उत्सव तरुणाईचा २०२६’ कार्यक्रमात आमदार अमित गोरखे यांनी विद्यार्थी आणि युवकांना मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहून आत्मविश्वास, शिस्त, आरोग्य आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर यश संपादन करण्याचा संदेश दिला.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पुणे, दि. ४ जून : आजच्या तरुण पिढीमध्ये अफाट क्षमता आहे, मात्र मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अनेक युवक स्वतःची खरी ताकद विसरत आहेत. करिअरच्या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक फिटनेस जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःचा ‘स्व’ ओळखून ध्येय निश्चित करावे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे प्रेरणादायी आवाहन आमदार अमित गोरखे यांनी केले.
सकाळ माध्यम समूहाच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित ‘उत्सव तरुणाईचा २०२६’ या विशेष युवा मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमास विविध शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी, शिक्षक, युवा कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संकटाच्या वेळी खऱ्या शक्तीची जाणीव होते
आपल्या भाषणात अमित गोरखे यांनी मोबाईलच्या अतिवापराबाबत चिंता व्यक्त केली. वॉकिंग करताना सतत रील्स पाहणाऱ्या विद्यार्थ्याचे उदाहरण देत त्यांनी युवकांना वेळेचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच सिंहाच्या पिल्लाची कथा सांगत संकटाच्या वेळी प्रत्येकाला आपल्या अंतर्गत शक्तीची जाणीव कशी होते, हे स्पष्ट केले.
“प्रत्येकाने आपल्यातील सुप्त गुण ओळखले पाहिजेत. आत्मविश्वास वाढवला पाहिजे. नियमित व्यायाम, सूर्यनमस्कार, योग आणि प्राणायाम यांचा अंगीकार केल्यास शरीर आणि मन दोन्ही सक्षम राहते,” असे ते म्हणाले.
राजकारणात येणाऱ्या युवकांसाठी संदेश
युवकांनी राजकारणात येण्याची इच्छा असल्यास केवळ सोशल मीडियावर सक्रिय राहून चालणार नाही, तर शिक्षण, नेतृत्वगुण, समाजाभिमुखता आणि अभ्यासावर भर दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. समाजात प्रत्यक्ष उतरून काम करण्याची तयारी ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीचा उल्लेख करत शिस्तबद्ध दिनचर्या, कठोर परिश्रम आणि सातत्य या यशाच्या महत्त्वाच्या किल्ल्या असल्याचे सांगितले.
‘विचारांनी स्मार्ट व्हा’
करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करताना अमित गोरखे म्हणाले, “प्रत्येकाने आपल्या आवडीचा विषय ओळखून त्यामध्ये सातत्याने मेहनत घेतली पाहिजे. योग्य संगत, सकारात्मक विचार आणि ध्येयाप्रती निष्ठा यामुळेच यशाचा मार्ग सुकर होतो. दिशा बदलली तर किनारे आपोआप बदलतात. स्क्रीनवर स्मार्ट दिसण्यापेक्षा विचारांनी स्मार्ट व्हा.”
मोठी स्वप्ने पाहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करा, यश निश्चितपणे तुमच्या पावलांशी येईल, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांनी आमदार अमित गोरखे यांच्या विचारांना आणि मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

