‘आपलं मंत्रालय’ एप्रिल अंकाचे प्रकाशन; टेक-वारीत मेंदू विकासावर मार्गदर्शन

‘आपलं मंत्रालय’ एप्रिल २०२६ अंकाचे डॉ. राजेश गवांदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. दरम्यान टेक-वारी २.० अंतर्गत मयूर चंदने यांनी मेंदू विकास व सकारात्मक विचारांवर मार्गदर्शन केले.

May 5, 2026 - 00:24
 0  2
‘आपलं मंत्रालय’ एप्रिल अंकाचे प्रकाशन; टेक-वारीत मेंदू विकासावर मार्गदर्शन
आपलं मंत्रालय, राजेश गवांदे, टेक वारी २.०, मयूर चंदने, मेंदू विकास,

मुंबई, दि. ४ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेच्या एप्रिल २०२६ अंकाचे प्रकाशन सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा अतिथी संपादक डॉ. राजेश गवांदे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अजय भोसले, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. किशोर गांगुर्डे तसेच प्रधान सचिव तथा महासंचालक यांचे विशेष कार्यअधिकारी इर्शाद बागवान उपस्थित होते.

या अंकामध्ये विविध विषयांचा समतोल आणि आशयपूर्ण आढावा घेण्यात आला आहे. राजशिष्टाचार उपविभागाच्या विस्तारामुळे राज्याच्या आर्थिक विकास व रोजगार निर्मितीस चालना मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डिजिटल सुरक्षा, महसूली संकल्पना आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या समकालीन विषयांवर लेख प्रकाशित करण्यात आले आहेत.

मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही गृहपत्रिका प्रकाशित केली जाते.

दरम्यान, ‘टेक-वारी २.०’ प्रशिक्षण सप्ताहाअंतर्गत ‘ऑप्टिमायजिंग दि ब्रेन कॅपॅसिटीज’ या विषयावर मनशक्तीचे मुख्य अभ्यासक्रम समन्वयक मयूर चंदने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मेंदूला सकारात्मक दिशेने प्रशिक्षित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

ते म्हणाले की, कोणतीही संधी नाकारण्याऐवजी स्वीकारल्यास व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो. ‘जस्ट डू इट’ आणि ‘ट्रेन युअर माईंड अँड चेंज युअर ब्रेन’ हे मंत्र आत्मसात करणे आवश्यक आहे. टाळाटाळ केल्यास मेंदूला नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळत नाही.

मानवी मेंदूची क्षमता प्रचंड असून तो उजव्या आणि डाव्या भागांमध्ये विभागलेला आहे. या दोन्ही भागांमध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. ‘वापरा नाहीतर गमवा’ या संकल्पनेवर त्यांनी भर देत सर्जनशील कृतींमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.

प्रत्येक आव्हानाला सकारात्मकतेने सामोरे गेल्यास मेंदूचा विकास होऊन व्यक्तीचे कल्याण साध्य होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0