डोंगर उतारावरील रहिवाशांनी तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे; महापालिकेचे आवाहन

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विक्रोळी आणि भांडूप परिसरातील डोंगर उतारावरील झोपडपट्टीवासीयांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केले आहे. दरड कोसळणे, भूस्खलन आणि पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Jun 9, 2026 - 03:39
Jun 9, 2026 - 20:18
 0  19
डोंगर उतारावरील रहिवाशांनी तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे; महापालिकेचे आवाहन
मुंबईत डोंगर उतारावरील रहिवाशांना महापालिकेचा इशारा; सुरक्षितस्थळी स्थलांतराचे आवाहन

मुंबई | प्रतिनिधी

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विक्रोळी आणि भांडूप परिसरातील डोंगर उतारांवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी संभाव्य धोके लक्षात घेऊन तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

महापालिकेच्या ‘एस’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील विक्रोळी पश्चिम येथील सूर्यानगर, पवई परिसरातील इंदिरानगर, गौतम नगर, पासपोली, जयभीम नगर तसेच भांडूप पश्चिम येथील रमाबाई आंबेडकर नगर (भाग 1 व 2), नरदास नगर, गावदेवी टेकडी, गावदेवी मार्ग, टेंभीपाडा, रावते कंपाऊंड, खिंडीपाडा, रामनगर, हनुमान नगर, हनुमान टेकडी, अशोक टेकडी आणि आंब्याची भरणी या भागांतील रहिवाशांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे डोंगर उतारांवर दरड कोसळण्याचा, भूस्खलन होण्याचा तसेच डोंगरावरील पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे घरांचे नुकसान होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. याशिवाय नाले व ओढ्यांना पूर आल्यास झोपड्या वाहून जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

या पार्श्वभूमीवर धोकादायक इमारती व झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेकडून यापूर्वीच सावधानतेच्या सूचना आणि नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन प्रशासनाने पुन्हा एकदा केले आहे.

महापालिकेने स्पष्ट केले आहे की, स्थलांतराचा सल्ला देऊनही संबंधित नागरिकांनी धोकादायक ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतल्यास त्याची जबाबदारी संबंधित रहिवाशांची स्वतःची राहील. नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्यास त्यासाठी महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचे ‘एस’ विभागाचे सहायक आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे.

पावसाळ्यातील संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.