भक्तिमय वातावरणात “देऊळ बंद २” चित्रपटाचा विशेष शो; भांडुपकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भांडुप पश्चिम येथे नगरसेविका राजोल पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित “देऊळ बंद २” चित्रपटाच्या विशेष शोला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्रद्धा, अध्यात्म आणि शेतकऱ्यांच्या संघर्षावर आधारित चित्रपटाने प्रेक्षकांना अंतर्मुख केले.
मुंबई ब्यूरो अनिल सावरे
मुंबई, दि. २९
श्रद्धा, अध्यात्म आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील संघर्ष यांचा प्रभावी संगम असलेल्या “देऊळ बंद २” या मराठी चित्रपटाच्या विशेष शोला भांडुपकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भांडुप पश्चिम प्रभाग क्रमांक ११४ च्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तिमय आणि सामाजिक जाणिवांनी भारलेले वातावरण निर्माण झाले होते.
चित्रपट प्रदर्शनापूर्वी प्रतिकात्मक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रुपात उपस्थित असलेल्या व्यक्तीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अनेकांनी श्रद्धेने नमस्कार करून आशीर्वाद घेतले. “श्री स्वामी समर्थ” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. त्यामुळे कार्यक्रमाला केवळ चित्रपट प्रदर्शनाचे स्वरूप न राहता श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर मिलाफ लाभला.
प्रविण तरडे दिग्दर्शित “देऊळ बंद २” या चित्रपटामध्ये शेतकऱ्यांच्या आयुष्यातील वेदना, संघर्षमय परिस्थिती, देवावरील श्रद्धा आणि समाजातील वास्तवाचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. या कथानकाने उपस्थित प्रेक्षकांना अंतर्मुख केले. अनेक नागरिकांनी चित्रपटानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी अधिक संवेदनशील होण्याची गरज व्यक्त केली.
नगरसेविका राजोल पाटील यांनी या आयोजनामागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, “आजचा शेतकरी कोणत्या मानसिक, आर्थिक आणि सामाजिक संकटातून जात आहे याची जाणीव शहरातील नागरिकांना व्हावी, तसेच श्रद्धा आणि अध्यात्माचा खरा अर्थ समजावा, यासाठी हा विशेष शो आयोजित करण्यात आला आहे. समाजाला विचार करायला लावणारे विषय लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.”
या कार्यक्रमासाठी महिलांपासून युवकांपर्यंत तसेच ज्येष्ठ नागरिकांसह कुटुंबांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. संपूर्ण सभागृह भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते.
कार्यक्रमाला ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनीही उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमाचे नियोजन निलेश सावंत आणि अमोल भोगले यांनी केले होते.
श्रद्धा, समाजप्रबोधन आणि शेतकऱ्यांविषयी कृतज्ञतेची भावना जागवणारा हा उपक्रम नागरिकांच्या मनात विशेष ठसा उमटवून गेला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0

