एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी एल निनोच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण आणि जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गतची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. भूजल पातळी वाढविण्यासाठी आणि टँकरग्रस्त गावांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजनांवर बैठकीत भर देण्यात आला.

May 8, 2026 - 22:50
 0  2
एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एल निनो महाराष्ट्र, देवेंद्र फडणवीस, जलयुक्त शिवार 2.0,

देवेंद्र फडणवीस यांनी एल निनोच्या संभाव्य संकटाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण तसेच जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गतची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. वर्षा या शासकीय निवासस्थानी आयोजित मृद व जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस संजय राठोड, सचिव जितेंद्र पापळकर, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, जलविषयक सल्लागार श्रीराम वेदिरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भूजल पातळी कमी झालेल्या भागांमध्ये प्राधान्याने कामे करून जलसाठा वाढविण्यावर भर द्यावा. जलयुक्त शिवार २.० अंतर्गत दुरुस्तीची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच राज्यस्तरीय आराखडे १५ मेपूर्वी मंजूर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

केंद्र शासनाच्या “विकसित भारत” योजनेअंतर्गत जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात येत असल्याचे सांगत त्यांनी या योजनेचा लाभ घेऊन राज्यातील जलसंधारण प्रकल्पांना गती देण्याचे आवाहन केले. नाला खोलीकरणानंतर पुन्हा गाळ साचू नये यासाठी नाल्यांच्या परिसरात बांबू लागवडीचा विचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

विदर्भातील मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीची कामे जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून अतिक्रमणे हटविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

यावेळी मंत्री संजय राठोड यांनी विभागाच्या कामात पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचे सांगितले. जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत आतापर्यंत १ लाख ४४ हजार ६९७ कामांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी १ लाख १० हजारांहून अधिक कामे पूर्ण झाल्याची माहिती सचिव जितेंद्र पापळकर यांनी दिली.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत यंदा १४३५ जलसाठ्यांमधून मोठ्या प्रमाणात गाळ काढण्यात आला असून त्यामुळे हजारो एकर जमीन सुपीक झाल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0