कांजूर डम्पिंगच्या विषारी विळख्यात ईशान्य मुंबई; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडला जागतिक प्रदूषण यादीत १२वा क्रमांक मिळाल्यानंतर ईशान्य मुंबईतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिथेन वायू गळती, दुर्गंधी आणि वाढत्या आरोग्य समस्यांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

May 29, 2026 - 22:10
 0  4
कांजूर डम्पिंगच्या विषारी विळख्यात ईशान्य मुंबई; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
कांजूर डम्पिंग ग्राऊंड, मुंबई प्रदूषण, मिथेन वायू, ईशान्य मुंबई

मुंबई ब्यूरो अनिल सावरे 

मुंबई दि 29

मुंबईतील कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडमुळे निर्माण झालेल्या प्रदूषणाच्या गंभीर समस्येने आता जागतिक स्तरावरही मुंबईची बदनामी केली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, लॉस एंजेलिस (UCLA) यांच्या २०२६ च्या STOP Methane Project अहवालानुसार कांजूरमार्ग लँडफिलला जगातील सर्वाधिक प्रदूषित लँडफिल्समध्ये १२वा क्रमांक मिळाला आहे. या अहवालानुसार दर तासाला सुमारे ४.९ टन मिथेन वायूची गळती होत असून हे प्रदूषण जवळपास दहा लाख SUV वाहनांच्या प्रदूषणाइतके धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या गंभीर पार्श्वभूमीवरही मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड आणि विक्रोळी परिसरातील लाखो नागरिकांना दुर्गंधी, प्रदूषित हवा आणि वारंवार लागणाऱ्या आगींचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

स्थानिकांच्या मते, मिथेन वायूचे वाढते प्रमाण आणि कचऱ्यामुळे निर्माण होणारे प्रदूषण यामुळे श्वसनाचे विकार, दमा, त्वचारोग, फुफ्फुसांचे आजार आणि अॅलर्जी यांसारख्या समस्या वाढत आहेत. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबईतील जवळपास ९० टक्के घनकचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या या डम्पिंग ग्राऊंडमध्ये सुमारे १८५ लाख मेट्रिक टनांहून अधिक जुना कचरा साचलेला असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यातून होणारे मिथेन उत्सर्जन रोखण्यासाठी कोणतीही प्रभावी यंत्रणा उभारण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, या प्रश्नावर न्यायालयानेही अनेकदा महापालिका आणि राज्य सरकारची कानउघाडणी केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेल्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनी देखील हा मुद्दा सातत्याने उपस्थित केला आहे. पालिका आयुक्तांसोबतच्या बैठका, डीपीडीसी बैठका तसेच लोकसभेतही त्यांनी कांजूर डम्पिंगमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेल्या परिणामांचा प्रश्न मांडला आहे. “मुंबईकरांच्या जीवाशी खेळ थांबवा आणि कांजूर डम्पिंगला पर्याय उपलब्ध करून द्या,” अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, देवनार येथे ६०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून सात मेगावॉट वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्याची घोषणा पालिकेकडून करण्यात आली असली, तरी त्याचा प्रत्यक्षात किती फायदा होणार याबाबत नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कांजूर डम्पिंग ग्राऊंड आता केवळ कचराभूमी न राहता ईशान्य मुंबईतील लाखो नागरिकांच्या आरोग्यावर घोंगावणारे “विषारी संकट” बनले असल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0