कोल्हापूरच्या विकासाचा ॲक्शन प्लॅन तयार करा; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

कोल्हापूर शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक पार पडली. वाहतूक शिस्त, अतिक्रमण निर्मूलन, पाणीपुरवठा आणि प्रलंबित विकासकामांवर भर देत प्रशासनाला ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.

Apr 28, 2026 - 04:42
 0  2
कोल्हापूरच्या विकासाचा ॲक्शन प्लॅन तयार करा; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश
प्रकाश आबिटकर, कोल्हापूर विकास योजना

कोल्हापूर : शहराचा कायापालट करण्यासाठी आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेची विशेष आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीत शहराच्या पायाभूत सुविधांपासून कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत तब्बल २८ विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

प्रशासनाने प्रत्यक्ष कृतीवर भर देत कोल्हापूरकरांना प्राधान्यक्रम ठरवून दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच शहराच्या विकासाचा ठोस ॲक्शन प्लॅन तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री आबिटकर यांनी दिले.

या बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महानगरपालिका आयुक्त Dr. राजेंद्र भारुड यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव तसेच महानगरपालिकेचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

बैठकीत ‘अमृत १’ आणि ‘अमृत २’ योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. थेट पाईपलाईन योजनेतील त्रुटी दूर करून ती पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर विशेष भर देण्यात आला.

आयटी पार्कला हायटेक करण्यासाठी सल्लागार समिती नेमणे, शाहू मिल स्मारक डीपीआर, जयप्रभा स्टुडिओ संवर्धन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही गांभीर्याने चर्चा झाली.

मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेत मे अखेर नालेसफाई आणि खराब रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. तावडे हॉटेल ते गांधीनगर रस्ता तसेच छत्रपती शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिर अंडरग्राउंड पार्किंग या नवीन प्रस्तावांवरही चर्चा करण्यात आली.

महापालिकेतील कंत्राटी कर्मचारी व ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना, विशेषतः अग्निशमन दलातील जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, याबाबत प्रशासनाला सूचना करण्यात आल्या.

आमदार राजेश क्षीरसागर यांनी झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड वाटप, लाड पागे समितीनुसार रखडलेल्या नियुक्त्या आणि सेवेत असताना मृत झालेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर सामावून घेण्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी कामांचे प्राधान्यक्रम ठरवून विकेंद्रीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका संयुक्तपणे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अतिक्रमण आणि ओपन स्पेसबाबत ऑडिट करून पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापौर रूपाराणी निकम यांनी प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा करत शासनाकडे अतिरिक्त निधीची मागणी केली. महत्त्वाच्या ठिकाणी सीएसआर निधीतून विकासकामे करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0