लोकल ट्रेनमध्ये १५ तास बेशुद्ध पडलेल्या पत्रकाराच्या प्रकरणी चौकशीची मागणी; रेल्वे प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह

मुंबई लोकलमध्ये तब्बल १५ तास बेशुद्ध अवस्थेत पडून राहिलेल्या पत्रकाराच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि पोलिसांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून चौकशी व कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

 - 
Apr 24, 2026 - 04:58
 0  14
लोकल ट्रेनमध्ये १५ तास बेशुद्ध पडलेल्या पत्रकाराच्या प्रकरणी चौकशीची मागणी; रेल्वे प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह
मुंबई लोकल, रेल्वे निष्काळजीपणा, पत्रकार बेशुद्ध, संजय शिंदे

मुंबई प्रतिनिधी उदय कासारे 

मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये एका ज्येष्ठ पत्रकाराला तब्बल १५ तास बेशुद्ध अवस्थेत पडून राहावे लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित प्रकरणी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ‘लोकांचे दोस्त’ संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ पत्रकार संजय नागनाथ शिंदे (वय ६०) हे १५ एप्रिल रोजी दुपारी सायन रेल्वे स्थानकावरून प्रवासासाठी निघाले होते. मात्र त्यानंतर त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क तुटला. सुमारे १५ तास ते लोकल ट्रेनमध्ये बेशुद्ध अवस्थेतच पडून होते. अखेर दुसऱ्या दिवशी सकाळी टिटवाळा येथून आलेल्या लोकलमध्ये ते आढळून आले आणि त्यांना कल्याण स्थानकात उतरवण्यात आले.

यावेळी रेल्वे पोलिसांनी त्यांना खासगी क्लिनिकमध्ये दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ दुसऱ्या रुग्णालयात हलवले. दोन दिवस अतिदक्षता विभागात उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली.

या प्रकरणात पोलिसांकडून निष्काळजीपणा झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच रुग्णाला गाडीतून उतरवताना मारहाण झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकारामुळे रेल्वे प्रशासनाच्या आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

‘लोकांचे दोस्त’ संघटनेचे अध्यक्ष रवि भिलाणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या प्रकरणी निवेदन दिले. त्यांनी विचारले आहे की, इतक्या दीर्घ काळ बेशुद्ध असलेल्या प्रवाशाची माहिती प्रशासनाला कशी मिळाली नाही? तसेच गंभीर रुग्णाला योग्य उपचार सुविधा का देण्यात आल्या नाहीत?

या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तत्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0