महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प; विकास, शांतता आणि हरित जिल्ह्याकडे वेगवान वाटचाल – सहपालकमंत्री ॲड. आदर्श जायसवाल

महाराष्ट्र दिनानिमित्त गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमात सहपालकमंत्री ॲड. आदर्श जायसवाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त केला. विकास, शांतता आणि हरित जिल्हा या त्रिसूत्रीवर आधारित सर्वांगीण प्रगतीचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

May 1, 2026 - 16:47
 0  2
महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प; विकास, शांतता आणि हरित जिल्ह्याकडे वेगवान वाटचाल – सहपालकमंत्री ॲड. आदर्श जायसवाल
गडचिरोली न्यूज, महाराष्ट्र दिन, आदर्श जायसवाल,

गडचिरोली, दि. १ मे (जिमाका) : महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त गडचिरोली येथे आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात सहपालकमंत्री ॲड. आदर्श जायसवाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त केला. विकास, शांतता आणि पर्यावरण संवर्धन या त्रिसूत्रीवर आधारित जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीचा निर्धार त्यांनी यावेळी मांडला.

पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

सहपालकमंत्री म्हणाले की, एकेकाळी विकासापासून दूर असलेला गडचिरोली जिल्हा आज परिवर्तनाच्या निर्णायक टप्प्यावर उभा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली माओवादावर प्रभावी नियंत्रण मिळवत जिल्ह्यात शांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील वर्षभरात आत्मसमर्पण, अटक आणि विविध कारवायांमुळे माओवादी प्रभाव कमी झाला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली आहे.

‘पोलीस दादालोरा खिडकी’ उपक्रमातून लाखो नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती

जिल्ह्यात विकासकामांचा वेग वाढला असून औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे. भविष्यात लाखो रोजगार निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खनिज संपत्तीवर आधारित उद्योगांमुळे गडचिरोली ‘स्टील सिटी’ म्हणून उदयास येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

हरित गडचिरोलीचा संकल्प

वनसंपदा आणि पर्यावरण जपत हरित विकासाचा मार्ग स्वीकारत गडचिरोलीला देशातील अग्रगण्य हरित जिल्हा बनवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. यासाठी आगामी काळात पाच कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पायाभूत सुविधा आणि रस्ते विकास

राष्ट्रीय महामार्ग, रस्ते आणि पूल बांधकामांची मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. गडचिरोली-आरमोरी चौपदरीकरणासह अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागले आहेत. खनिज वाहतुकीमुळे वाढलेल्या ताणाचा विचार करून रस्ते विकासासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ६९७ कोटी रुपयांचा शंभर टक्के खर्च करण्यात प्रशासनाला यश आल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य, पाणीपुरवठा आणि ग्रामीण विकास

आरोग्य सेवांमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ३.० टेस्ला एमआरआय मशीन सुरू करण्यात येत आहे. आयुष्मान भारत योजनेंतर्गत लाखो नागरिकांना लाभ मिळत आहे. जल जीवन मिशनमुळे ग्रामीण भागात नळजोडण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत अभियान आणि इतर ग्रामीण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जीवनमान उंचावत असल्याचे त्यांनी नमूद केले.

शेती, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण

शेतकरी सक्षमीकरणासाठी बळीराजा शेत-पाणंद रस्ते योजना, सौर कुंपण आणि ‘कोया कृषी कुंभ’ सारख्या उपक्रमांचा उल्लेख त्यांनी केला. शिक्षण क्षेत्रात डिजिटल क्लासरूम, विज्ञान प्रयोगशाळा आणि ग्रंथालयांमुळे विद्यार्थ्यांना सक्षम केले जात आहे.

महिला बचत गटांना विविध साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात येत असून तरुणांसाठी कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत आहेत.

विविध वाहनांचे लोकार्पण, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विविध शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. तसेच खनिज निधीतून उपलब्ध करून देण्यात आलेल्या फूड व्हॅन आणि रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0