१२ वर्षांत लोकसभेत सर्वाधिक सहभाग; मावळच्या विकासासाठी रेल्वे, मेट्रो, रस्ते आणि पर्यटन प्रकल्पांना गती – खासदार श्रीरंग बारणे
मावळ लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी गेल्या १२ वर्षांत रेल्वे, मेट्रो, रस्ते, पर्यटन आणि पाणीपुरवठा क्षेत्रात मोठी कामे मार्गी लावल्याचा दावा खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. लोकसभेत ९६ टक्के उपस्थिती, २०१२ प्रश्न, ५१३ चर्चांमधील सहभाग आणि ३६ खासगी विधेयके सादर केल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे
पिंपरी, दि. १ जून २०२६ : मावळ लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी गेल्या बारा वर्षांत रेल्वे, मेट्रो, रस्ते, पर्यटन, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावल्याचा दावा खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. खासदारकीच्या तिसऱ्या कार्यकाळातील दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या कामाचा सविस्तर आढावा सादर केला.
यावेळी बोलताना खासदार बारणे म्हणाले की, १६ वी, १७ वी आणि १८ वी लोकसभा मिळून त्यांनी एकूण २०१२ प्रश्न उपस्थित केले असून ५१३ चर्चांमध्ये सहभाग घेतला आहे. तसेच ३६ खासगी सदस्य विधेयके सादर केली असून लोकसभेतील उपस्थिती ९६ टक्के राहिली आहे. उत्कृष्ट संसदीय कामगिरीबद्दल त्यांना पाच वेळा ‘संसद रत्न’, एकदा ‘संसद महारत्न’ आणि दोन वेळा ‘संसद उत्कृष्ट महारत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
मेट्रो आणि रेल्वे प्रकल्पांना चालना
पिंपरी ते भक्ती-शक्ती चौक, निगडीपर्यंत मेट्रो मार्गाला मंजुरी मिळवून देण्यात यश आल्याचे सांगताना बारणे यांनी या कामाची ५० टक्क्यांहून अधिक प्रगती झाल्याचे नमूद केले. तसेच हिंजवडी, वाकड, पिंपळे सौदागर, भोसरी ते चाकण या नव्या मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार झाल्याची माहिती दिली.
पनवेल-उरण रेल्वे मार्ग पूर्ण करून लोकल सेवा सुरू करण्यात आली असून पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाचे कामही अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे-लोणावळा तिसरा आणि चौथा रेल्वे ट्रॅक प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारची मंजुरी मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
रस्ते आणि पायाभूत सुविधांमध्ये मोठी कामगिरी
अटल सेतू, पनवेल-उरण राष्ट्रीय महामार्ग, किवळे-वाकड उड्डाणपूल, तळेगाव-चाकण-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग यांसारख्या प्रकल्पांमुळे वाहतूक सुलभ होणार असल्याचे बारणे यांनी सांगितले. मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
पर्यटन विकासाला चालना
एकवीरा देवी मंदिर परिसराला तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाचा दर्जा मिळवून देणे, माथेरानची ऐतिहासिक मिनी ट्रेन पुन्हा सुरू करणे, एलिफंटा लेणी परिसरात पायाभूत सुविधा उभारणे तसेच लोहगड, विसापूर, राजमाची, तिकोना आणि तुंग किल्ल्यांच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देणे ही महत्त्वाची कामे असल्याचे त्यांनी सांगितले.
पाणी, शेती आणि जनकल्याणावर भर
पवना धरणातील गाळ काढण्याच्या उपक्रमामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली असून पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याचे बारणे यांनी सांगितले. तसेच दुर्गम आदिवासी भागात वीज पोहोचविणे, रस्ते उभारणे, मच्छीमारांसाठी करंजा मत्स्य बंदर उभारणे, शेतकऱ्यांना जमीन परतावा मिळवून देणे आणि दिव्यांगांसाठी विविध साहित्य वाटप यांसारख्या उपक्रमांचाही त्यांनी आढावा घेतला.
लोकसभेत विविध प्रश्नांवर प्रभावी भूमिका
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, पर्यावरण संरक्षण, सक्तीचे मतदान, सौर ऊर्जा, क्रीडा सुविधा यांसारख्या विविध विषयांवर लोकसभेत आवाज उठविल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. त्यांनी सादर केलेल्या ३६ खासगी विधेयकांमधून अनेक महत्त्वाच्या सामाजिक आणि विकासात्मक विषयांना प्राधान्य दिल्याचे त्यांनी नमूद केले.
मतदारसंघातील विकासकामे, संसदीय कामगिरी आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे मावळ लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाल्याचा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0