मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 इतर राज्यांसाठी आदर्श; कोल्हापुरात आभा शुक्ला यांचे प्रतिपादन

कोल्हापुरातील जिल्हास्तरीय टास्क फोर्स बैठकीत अतिरिक्त मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 ही इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा, सौर ऊर्जा निर्मिती वाढ आणि सरकारी कार्यालयांवर सोलर पॅनल बसविण्याचे निर्देश देण्यात आले.

May 4, 2026 - 01:05
 0  2
मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 इतर राज्यांसाठी आदर्श; कोल्हापुरात आभा शुक्ला यांचे प्रतिपादन
मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0,

कोल्हापूर, दि. 3: मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 ही इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी केले.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय टास्क फोर्स आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर सचिव तथा महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, पोलीस अधीक्षक नीलोत्पल बसू यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

आभा शुक्ला यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेतील सर्व प्रकल्प ठरलेल्या वेळेत पूर्ण करावेत. अन्यथा संबंधित ठेकेदारांची सुरक्षा ठेव जप्त करण्यात येईल. तसेच जास्तीत जास्त सरकारी कार्यालयांवर सोलर पॅनल बसविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्र राज्य अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत देशात दुसऱ्या स्थानी पोहोचले असून ऑफग्रीड सोलर पंप बसविण्यात 69 टक्के काम पूर्ण करून राज्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

यावेळी महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र म्हणाले की, पंतप्रधान सूर्यघर योजना आणि सौरग्राम योजना यामध्ये लोकसहभाग वाढविणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणने 80 कार्यालयांवर सौर पॅनल बसविले असून हे काम 100 टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

औद्योगिक ग्राहकांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, राज्यात सौर ऊर्जा साठवणुकीसाठी 400 मेगावॉट क्षमता उपलब्ध असून भविष्यात ती 12 हजार मेगावॉटपर्यंत वाढविण्याचे ध्येय आहे.

तसेच स्मार्ट मीटर हे प्रीपेड नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिल आणि नोंदणीसंदर्भातील तक्रारींमध्ये मोठी घट झाली आहे.

बैठकीला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सौर कृषिवाहिनी योजनेचे ठेकेदार, औद्योगिक ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी, अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0