मुंबईतील ५४७ उदंचन पंपांवर ‘आयओटी’ आधारित देखरेख व्यवस्था; पावसाळी व्यवस्थापन अधिक सक्षम
मुंबई महानगरातील सखल भागांमधील पावसाच्या पाण्याचा जलद निचरा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ५४७ उदंचन पंपांवर ‘आयओटी’ आधारित देखरेख प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमुळे पंपांचे रिअल-टाइम निरीक्षण, तांत्रिक अडचणींची तत्काळ माहिती आणि आपत्कालीन परिस्थितीत जलद निर्णय घेणे शक्य होणार आहे.
मुंबई | प्रतिनिधी
मुंबई महानगरातील सखल भागांमध्ये पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा जलद निचरा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागामार्फत कार्यान्वित करण्यात आलेल्या ५४७ उदंचन संचांवर (Portable Dewatering Pumps) आता आधुनिक ‘आयओटी आधारित देखरेख प्रणाली’ (IoT Based Monitoring System) लागू करण्यात आली आहे.
महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी या नव्या प्रणालीची माहिती देताना सांगितले की, प्रत्येक उदंचन पंपावर ‘आयओटी’ उपकरण बसविण्यात आले असून त्याद्वारे पंपांची कार्यस्थिती, सुरू-बंद होण्याची वेळ, स्थान, कार्यरत कालावधी आणि तांत्रिक माहितीची स्वयंचलित नोंद ठेवली जाणार आहे. ही माहिती केंद्रीकृत डॅशबोर्डवर प्रत्यक्ष वेळेत उपलब्ध होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना पंपांच्या कार्याचा तत्काळ आढावा घेणे आणि आपत्कालीन परिस्थितीत जलद निर्णय घेणे सुलभ होणार आहे.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार शहर विभागात १४६, पूर्व उपनगरांमध्ये १७८ आणि पश्चिम उपनगरांमध्ये २२३ असे एकूण ५४७ उदंचन संच तैनात करण्यात आले आहेत. विशेषतः सखल भाग, रेल्वे उपमार्ग, महत्त्वाचे चौक, रस्ते आणि पूरप्रवण परिसरात हे पंप कार्यरत ठेवण्यात आले आहेत.
आयओटी लॉगिंग प्रणालीमुळे पंप किती वेळ सुरू होता, किती वेळ पाण्याचा उपसा करण्यात आला आणि यंत्रणेचा वापर योग्य पद्धतीने झाला का, याची डिजिटल नोंद उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कार्यपद्धतीमध्ये पारदर्शकता वाढून मानवी हस्तक्षेप कमी होण्यास मदत होणार असल्याचे श्रीमती भिडे यांनी स्पष्ट केले.
या प्रणालीसाठी ‘डिवॉटरिंग पंप मॉनिटरिंग सिस्टीम डॅशबोर्ड’ विकसित करण्यात आला असून सर्व उदंचन संचांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. काही ठिकाणी बसविण्यात आलेल्या सेन्सरमुळे पाण्याची पातळी वाढल्यास तात्काळ अलर्ट मिळणार असून संबंधित यंत्रणा सक्रिय केली जाणार आहे.
उदंचन संच कार्यरत ठेवण्यासाठी ३ सत्रांमध्ये मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. पंप चालकांना स्मार्टफोन देण्यात आले असून त्याद्वारे प्रत्यक्ष ठिकाणचे छायाचित्र नियंत्रण कक्षात त्वरित पाठविता येणार आहे. तसेच प्रत्येक चालकाच्या मोबाईलचे जिओ-फेन्सिंग करण्यात येणार असून अँड्रॉइड अॅपच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर देखरेख ठेवली जाणार आहे.
आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले की, हवामान विभागाकडून मिळणारा पावसाचा अंदाज, भरती-ओहोटीची माहिती आणि क्षेत्रातील परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित भागातील उदंचन पंप तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या जातात. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी ही प्रणाली अत्यंत प्रभावी ठरणार आहे.
या पाहणीवेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उप आयुक्त प्रशांत गायकवाड, प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे तसेच कार्यकारी अभियंता वनिता कोकाटे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1

