पवना धरणातून गाळ काढण्यास प्रारंभ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने सलग दहावे वर्ष

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातून गाळ काढण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून सलग दहाव्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असून धरणाची साठवण क्षमता वाढविण्याचा उद्देश आहे.

Apr 28, 2026 - 04:27
 0  1
पवना धरणातून गाळ काढण्यास प्रारंभ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने सलग दहावे वर्ष
पवना धरणातून गाळ काढण्यास प्रारंभ; खासदार श्रीरंग बारणे

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणाऱ्या मावळ तालुक्यातील पवना धरणातून गाळ काढण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ व्हावी आणि भविष्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊ नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकाराने सलग दहाव्या वर्षी हा उपक्रम सुरू ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे शासनाचा कोणताही निधी न घेता लोकसहभागातून हे काम केले जात आहे.

रविवारी विधिवत पूजन करून खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाऊ खांडभोर, मावळ तालुका प्रमुख राम सावंत, उपतालुका प्रमुख अमित कुंभार, युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाचरणे, दत्ताभाऊ केदारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या ५० वर्षांत पवना धरणातील गाळ काढला गेला नव्हता. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यावर परिणाम होत होता. मागील नऊ वर्षांपासून नियमितपणे गाळ काढण्यास सुरुवात केल्यानंतर धरणातील साठवण क्षमतेत वाढ झाली असून उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत नसल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की, पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा होतो. मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाणीसाठ्यात अडथळा निर्माण होत होता. यापूर्वी शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, गाळ काढण्याच्या उपक्रमामुळे परिस्थितीत सुधारणा झाली आहे.

आजपर्यंत सुमारे ८५ हजार क्युबिक मीटर गाळ धरणातून काढण्यात आला आहे. यंदाही पावसाळा सुरू होईपर्यंत गाळ काढण्याचे काम सुरू राहणार आहे.

गाळातून गुलाब शेतीलाही फायदा

पवना धरणातून काढण्यात आलेला गाळ मावळातील शेतकऱ्यांना मोफत दिला जातो. मावळ तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गुलाबाची निर्यात केली जाते. पोयटा मातीमुळे गुलाब शेतीला मोठा फायदा होत असून उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे जलसंधारणासोबतच शेती क्षेत्रालाही या उपक्रमाचा दुहेरी लाभ होत आहे.

स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांचे आभार मानले आहेत.

Keywords (Meta Tags):

पवना धरण बातमी, श्रीरंग बारणे, पवना धरण गाळ काढणे, मावळ पाणीपुरवठा, पिंपरी चिंचवड पाणी, पवना धरण साठवण क्षमता, मावळ बातम्या, गुलाब शेती मावळ, पाणीटंचाई उपाय, महाराष्ट्र न्यूज

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0