पिंपरी-चिंचवडमध्ये ‘बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रम; प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी Bisleri International आणि महापालिकेची पुढाकार

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि बिसलेरी इंटरनॅशनल यांच्या संयुक्त उपक्रमातून प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्वापरासाठी ‘बॉटल्स फॉर चेंज’ मोहीम राबविण्यात येत असून पुनर्वापरित प्लास्टिकपासून तयार केलेले बेंच आणि कचरा डबे अनावरण करण्यात आले.

Apr 18, 2026 - 21:13
 0  2
पिंपरी-चिंचवडमध्ये ‘बॉटल्स फॉर चेंज’ उपक्रम; प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी Bisleri International आणि महापालिकेची पुढाकार
पिंपरी चिंचवड कचरा व्यवस्थापन, बिसलेरी बॉटल्स फॉर चेंज,

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

पिंपरी-चिंचवड : शहरात पर्यावरणपूरक सवयी रुजवण्यासाठी ‘बॉटल्स फॉर चेंज’सारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केले. प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Bisleri International आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत पुनर्वापरित प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेल्या बसण्याच्या बाकड्यांचे आणि कचरा संकलन डब्यांचे अनावरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला महापौर रवि लांडगे यांच्यासह उपमहापालिका आयुक्त व आरोग्य विभाग प्रमुख डॉ. प्रदीप थेंगल, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि बिसलेरीचे सस्टेनेबिलिटी व कॉर्पोरेट अफेअर्स संचालक के. गणेश उपस्थित होते.

के. गणेश यांनी सांगितले की, कचरा जिथे निर्माण होतो तिथेच त्याचे वर्गीकरण करण्याबाबत जनजागृती, शैक्षणिक संस्थांशी सहकार्य आणि विविध मोहिमांमुळे कचरा व्यवस्थापनाचा प्रभावी मार्ग तयार झाला आहे. भारतात योग्य कचरा व्यवस्थापन ही सवय बनावी यासाठी बिसलेरी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

महापौर रवि लांडगे यांनी बिसलेरीसोबतच्या भागीदारीचे कौतुक करत सांगितले की, या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणातील कचरा लँडफिलमध्ये जाणार नाही, नागरिकांमध्ये जागरूकता वाढेल आणि सर्क्युलर इकॉनॉमीसाठी मजबूत पाया तयार होईल.

डॉ. प्रदीप थेंगल यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणावर कचरा व्यवस्थापनासाठी मजबूत प्रणाली उभारण्यावर भर असून हा उपक्रम शाश्वत शहर उभारणीसाठी महत्त्वाचा ठरत आहे.

यावेळी पिंपरी-चिंचवडमधील ८ शैक्षणिक संस्थांचा सन्मान करण्यात आला. या संस्थांनी वर्षभर प्लास्टिक कचरा संकलनात सक्रिय सहभाग नोंदवला होता.

२०२५-२६ या वर्षात पिंपरी-चिंचवडमध्ये २१९ मेट्रिक टन प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. तसेच बिसलेरीने देशभरात ३०,३०९ मेट्रिक टन प्लास्टिक कचरा संकलित करून पुनर्वापरासाठी पाठवला आहे.

हा उपक्रम ‘ग्रीनर प्रॉमिस’ मोहिमेचा भाग असून प्लास्टिक पुनर्वापर, जलसंधारण आणि शाश्वत कचरा व्यवस्थापन यावर भर देण्यात येत आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0