शासकीय शाळांचा दर्जा उंचावून पटसंख्या वाढवा; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी 2026-27 शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या विविध विषयांचा आढावा घेत शासकीय शाळांचा दर्जा उंचावण्यावर आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यावर भर दिला. प्रवेशोत्सव, दर्जेदार गणवेश, पायाभूत सुविधा, मराठी भाषा शिक्षण आणि ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Jun 3, 2026 - 01:21
 0  3
शासकीय शाळांचा दर्जा उंचावून पटसंख्या वाढवा; शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन
दादाजी भुसे, शालेय शिक्षण विभाग, शाळा प्रवेशोत्सव

मुंबई, दि. 2 : राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा ज्ञानदानाचे उत्कृष्ट कार्य करीत असून त्यांचा आदर्श घेऊन सर्व शासकीय शाळांचा दर्जा उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

2026-27 या नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात आयोजित बैठकीत शालेय शिक्षण विभागाच्या विविध विषयांचा आढावा घेताना त्यांनी हे निर्देश दिले. बैठकीस प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले की, मागील वर्षी शाळा प्रवेशोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यावर्षीही विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत त्याच उत्साहात करण्यात यावे. शाळा सुरू होण्यापूर्वी परिसर स्वच्छता, वर्गखोल्यांची तयारी आणि विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी दर्जेदार गणवेश उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा.

बालभारतीमार्फत 80 टक्के पाठ्यपुस्तके शाळांपर्यंत पोहोचली असून उर्वरित पुस्तकेही शाळा सुरू होण्यापूर्वी उपलब्ध होतील, याची खात्री करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शाळांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणी, स्वच्छतागृहे, रंगरंगोटी, दुरुस्ती, विद्यार्थीनींसाठी ‘पिंक रूम’ आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेसारख्या मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. तसेच जवाहर बालभवनच्या धर्तीवर कला, अभिनय, संगीत आणि वक्तृत्व अशा उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचेही आवाहन केले.

शाळांच्या विकासासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) तसेच माजी विद्यार्थी संघटनांचे सहकार्य घेण्याची सूचना करताना अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळांच्या आवारात सुरू करण्यावर त्यांनी भर दिला. यामुळे भविष्यात शाळांमधील विद्यार्थीसंख्या वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थी सुरक्षा योजनांची प्रभावी अंमलबजावणी, शिक्षक भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे, शाळा समित्यांच्या नियमित बैठका घेणे, शिष्यवृत्ती परीक्षांमधील यशाचे प्रमाण वाढविणे आणि अधिकाऱ्यांनी नियमितपणे शाळांना भेटी देणे याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.

सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे अनिवार्य असल्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या 300 कोटी वृक्षलागवड संकल्पात शाळांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

मागील वर्षी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायतीद्वारे विश्वविक्रम नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांचे तसेच पीजीआय (परफॉर्मन्स ग्रेड इंडिकेटर) मानांकनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याचे मंत्री भुसे यांनी विशेष अभिनंदन केले.

राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि शासकीय शाळांवरील पालकांचा विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठी शिक्षण विभागाने समन्वयाने काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0