राज्यात आदिवासी अध्यासन केंद्रांना चालना; आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी वाढणार

राज्यातील आदिवासीबहुल भागातील विद्यापीठांमध्ये आदिवासी अध्ययन आणि संशोधनाला चालना देण्यासाठी आदिवासी अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण, संशोधन आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.

May 12, 2026 - 22:33
May 12, 2026 - 22:34
 0  3
राज्यात आदिवासी अध्यासन केंद्रांना चालना; आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी वाढणार
आदिवासी अध्यासन केंद्र, चंद्रकांत पाटील, आदिवासी संशोधन, महाराष्ट्र विद्यापीठे, आदिवासी विद्यार्थी, उच्च शिक्षण महाराष्ट्र, आदिवासी विकास, गडचिरोली विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ

मुंबई प्रतिनिधी उदय कासारे 

राज्यातील आदिवासीबहुल क्षेत्रांमध्ये उच्च शिक्षण आणि संशोधनाला नवी दिशा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आदिवासी अध्ययन, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये आदिवासी अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली.

मंत्रालयात आयोजित बैठकीत या केंद्रांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीस आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर तसेच मुंबई, जळगाव, नांदेड, अमरावती आणि गडचिरोली विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, सध्या मुंबई, जळगाव आणि नांदेड विद्यापीठांमध्ये आदिवासी अध्यासन केंद्र कार्यरत आहेत. आता अमरावती आणि गडचिरोली विद्यापीठांमध्येही नवीन केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रांच्या उभारणीसाठी आदिवासी विकास विभागाकडून प्रत्येकी ३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

या निधीतून संशोधन उपक्रम, शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. आदिवासी समाजाची समृद्ध लोकसंस्कृती, भाषा, परंपरा आणि जीवनशैली जतन करण्यासाठी संशोधनाधारित उपक्रम राबवले जाणार आहेत.

आदिवासी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासासाठी संशोधनाला चालना देणे हा या केंद्रांचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासोबतच संशोधनाच्या नव्या संधी उपलब्ध होतील.

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले की, या केंद्रांच्या माध्यमातून आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान आणि संस्कृती जतन करण्यास मदत होईल. तसेच शिक्षण आणि संशोधनाच्या माध्यमातून आदिवासी युवकांना रोजगारक्षम बनविण्यावरही भर दिला जाणार आहे.

राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचा उच्च व तंत्र शिक्षणातील सहभाग वाढवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0