वाशी नाका व ऐरोली नाका येथे फुलणार हरित सौंदर्य; जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपणाचा शुभारंभ

मुंबईचे प्रमुख प्रवेशमार्ग असलेल्या वाशी नाका आणि ऐरोली नाका परिसरात व्यापक हरितक्षेत्र विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रातिनिधिक शुभारंभ होणार आहे.

Jun 1, 2026 - 22:27
 0  3
वाशी नाका व ऐरोली नाका येथे फुलणार हरित सौंदर्य; जागतिक पर्यावरण दिनी वृक्षारोपणाचा शुभारंभ
वाशी नाका हरित विकास, ऐरोली नाका वृक्षारोपण, मुंबई महापौर रितू तावडे,

मुंबई, दि. १ जून : मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकारातून मुंबईचे महत्त्वाचे प्रवेशमार्ग असलेल्या वाशी नाका आणि ऐरोली नाका परिसरात पर्यावरणपूरक आणि आकर्षक हरितक्षेत्र विकास प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा प्रातिनिधिक शुभारंभ जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून २०२६ रोजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात येणार आहे.

महापौर रितू तावडे यांनी सोमवारी वाशी नाका आणि ऐरोली नाका परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. महामार्गाच्या दुतर्फा हरित क्षेत्र विकसित करणे, अनावश्यक झुडपे व तण काढून परिसर स्वच्छ करणे, तसेच नियोजनबद्ध वृक्षारोपण करून परिसर अधिक नयनरम्य बनविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

याशिवाय, पंतनगर ते मुलुंड दरम्यानच्या पूर्व द्रुतगती महामार्गालगत खाडीकिनारी असलेल्या भागात पिवळ्या बहाव्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचा विशेष उपक्रम राबविण्याचे निर्देशही महापौरांनी दिले. एन, एस आणि टी या तिन्ही प्रशासकीय विभागांच्या समन्वयातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

महापौर तावडे यांनी सांगितले की, मुंबईत प्रवेश करताना वाशी नाका आणि ऐरोली नाका या ठिकाणांहून दररोज हजारो वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे या परिसरांचे सुशोभीकरण आणि पर्यावरणीयदृष्ट्या विकास करणे आवश्यक आहे. या हरित प्रकल्पामुळे धूळ नियंत्रण, वायूप्रदूषण कमी करणे आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे.

प्रकल्पाअंतर्गत पिंक टेब्यूबिया, पिवळा बहावा आणि स्थानिक जैवविविधतेला पूरक असलेल्या विविध वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या वृक्षांमुळे परिसराचे सौंदर्य वाढण्याबरोबरच पर्यावरणीय समतोल राखण्यासही मदत होईल.

ऐरोली नाका परिसरातील खाडीकिनारी बहाव्याचा विशेष पट्टा विकसित करण्यात येणार असून त्यामुळे हरित आच्छादन वाढेल, कार्बन शोषणाला चालना मिळेल आणि पक्षी व इतर जीवांसाठी अनुकूल अधिवास निर्माण होईल. नागरिकांना अधिक स्वच्छ व निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

महापौरांनी या मोहिमेत महानगरपालिका प्रशासन, विविध शासकीय विभाग, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. मुंबईच्या हरित विकासाला बळकटी देणारा हा उपक्रम भविष्यात आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0