यवतमाळचा बळीराजा आता विमा कंपन्यांचा कोथळा बाहेर काढणार; उद्या कृषी कार्यालयावर मुक्काम पोस्ट आंदोलन
यवतमाळ जिल्ह्यात पीक विमा नाकारला जात असल्याच्या आरोपावरून शेतकरी संघटनांनी संतप्त भूमिका घेतली आहे. उद्या २७ एप्रिल रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर मुक्काम पोस्ट आंदोलन छेडण्याचा इशारा देत हजारो शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.
रवि वाघमारे
जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ
यवतमाळ : शेतकरी आत्महत्यांनी कलंकित झालेल्या यवतमाळ जिल्ह्यात आता पीक विमा प्रश्नावरून संताप उसळला आहे. शेतकऱ्यांना हक्काचा विमा नाकारला जात असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. उद्या २७ एप्रिल सोमवार रोजी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर मुक्काम पोस्ट आंदोलन छेडण्यात येणार असून हजारो शेतकरी यात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शेतकरी नेत्यांनी आरोप केला की, सरकारी यंत्रणा आणि विमा कंपन्यांच्या निष्क्रियतेमुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात १८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचा दावा करत या घटनांसाठी प्रशासन आणि विमा कंपन्यांना जबाबदार धरले जात आहे.
“नांदेडला विमा मिळतो, मग यवतमाळला का नाही?”
नांदेड जिल्ह्यात पीक विमा मंजूर होत असताना यवतमाळच्या शेतकऱ्यांना विमा नाकारला जात असल्याचा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. “यवतमाळच्या शेतकऱ्याच्या ताटात माती का?” असा संतप्त प्रश्न विचारत शेतकरी संघटनांनी अन्यायाविरुद्ध निर्णायक लढा उभारण्याचा इशारा दिला आहे.
प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप
शेतकरी नेत्यांच्या मते, वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दखल घेतली नाही. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेतल्या नाहीत, तर विमा कंपन्या कोट्यवधींचा निधी घेत असूनही लाभ देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हजारो शेतकरी रस्त्यावर उतरणार
उद्याच्या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने शेतकरी यवतमाळ शहरात जमणार असून, पीक विमा मंजूर होईपर्यंत कृषी कार्यालयाचा ताबा सोडला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.
संतप्त इशारा
“आता माघार नाही, फक्त प्रहार”, अशी भूमिका घेत शेतकरी संघटनांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. पीक विमा आणि शेतकरी प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0