आरे परिसरात 80 एकर जागेत 5 लाख वृक्षारोपण; भविष्यातील पिढ्यांसाठी समृद्ध जंगल निर्माण करणार – मंत्री ॲड. आशिष शेलार
हरित महाराष्ट्र – 300 कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबईतील आरे परिसरात 80 एकर जागेत 5 लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करताना पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आरे परिसर हिरवागार, समृद्ध आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी जंगल म्हणून विकसित करण्याचा संकल्प व्यक्त केला.
प्रतिनिधी | सागर ठोकळे
आरेत 80 एकर जागेत 5 लाख झाडांची लागवड; ‘हिरवागार आणि प्रेरणादायी जंगल’ उभारण्याचा संकल्प
मुंबई, दि. 5 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित महाराष्ट्र – 300 कोटी वृक्षारोपण’ मोहिमेअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत आरे परिसरातील सुमारे 80 एकर रिक्त जागेत तब्बल 5 लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आरे कॅम्प परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी आमदार मुरजी पटेल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश मुसळे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ॲड. आशिष शेलार म्हणाले की, आरेला आतापर्यंत केवळ कागदोपत्री जंगल म्हणून ओळख होती. आता या परिसरात प्रत्यक्ष हिरवाईने नटलेले, जैवविविधतेने समृद्ध आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असे जंगल निर्माण करण्यात येणार आहे.
80 एकर जागेत वृक्षारोपण
‘हरित महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत आरे कॅम्प, मेट्रो कारशेड परिसर, मेट्रो भवनाच्या राखीव जागा, राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ परिसर, कृषी उद्योग विकास महामंडळ, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8, फोर्स वन, महानंद डेअरी आणि पशुवैद्यकीय महाविद्यालय परिसराची पाहणी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अहवालानुसार या सर्व ठिकाणी मिळून सुमारे 80 एकर जागा वृक्षारोपणासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
या उपक्रमात जीआयएस आधारित नियोजन, डिजिटल मॉनिटरिंग प्रणाली आणि वृक्षसंवर्धनासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात येणार आहे. प्रत्येक वृक्षाची वाढ, संवर्धन आणि टिकाव यावर नियमितपणे लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती शेलार यांनी दिली.
मियावाकी पद्धतीने शहरी जंगल
पारंपरिक वृक्षारोपणासोबतच मियावाकी पद्धतीचा अवलंब करून घनदाट, स्वयंपोषक आणि जैवविविधतेने समृद्ध शहरी जंगल विकसित करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. पर्यावरण संरक्षण, जैवविविधतेचे संवर्धन आणि शाश्वत विकास यांचा समन्वय साधत मुंबई उपनगर अधिक हिरवे, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याचा संकल्प या मोहिमेमागे असल्याचे ॲड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमामुळे मुंबईतील हरित क्षेत्र वाढण्यास मदत होणार असून भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरणपूरक वारसा निर्माण करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0