मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

राज्यातील खासगी बस वाहतूकदारांकडून होणारी मनमानी भाडेवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची आर्थिक पिळवणूक रोखण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

May 13, 2026 - 19:56
 0  3
मनमानी भाडेवाढ करणाऱ्या खासगी बस वाहतूकदार आणि अवैध प्रवासी ॲप्सवर कारवाई करा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
प्रताप सरनाईक, खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲप्स, बस भाडेवाढ, परिवहन विभाग, एसटी बसस्थानके, महाराष्ट्र परिवहन, प्रवासी सुविधा, राजेश नार्वेकर, सुराज्य अभियान, बस तिकीट दर, परिवहन मंत्री

मुंबई, दि. १३ :

राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर भाडेवाढ आणि अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक याबाबत राज्य शासन गंभीर असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

या संदर्भातील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तसेच दीर्घकालीन उपाययोजना सुचविण्यासाठी सह परिवहन आयुक्त आणि सुराज्य अभियानातील तीन प्रतिनिधींचा समावेश असलेली विशेष समिती गठित करण्याचे निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अपर परिवहन आयुक्त भरत कळसकर तसेच सुराज्य अभियान संघटनेचे अभिषेक मुरुकटे, अरविंद पानसरे आणि सुनील हनवट उपस्थित होते.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ॲप्सना आळा घालणे आणि प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचविणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

सध्या अनेक खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या अनधिकृत ॲप्सच्या माध्यमातून प्रवाशांचे बुकिंग करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. सण, उत्सव किंवा सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारले जात असल्याने सामान्य नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

“प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या अशा बस वाहतूकदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची लूट खपवून घेतली जाणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यातील बसस्थानकांवरील संपर्क यंत्रणा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक बसस्थानकावर प्रवासी सुविधांसाठी संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच परिवहन विभागाने नावे बदललेल्या गावांबाबत आणि व्याकरणदृष्ट्या अचूक मराठी भाषेच्या वापराबाबत परिपत्रक जारी करून त्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.

राज्यातील एसटी बस आणि बसस्थानकांच्या अस्वच्छतेबाबत प्रवाशांकडून वारंवार तक्रारी येत असल्याचे सांगून बसस्थानकांचा कायापालट करण्यासाठी आणि कायमस्वरूपी स्वच्छता राखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

१ जूनपासून महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे मोफत करण्यात येणार असून प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0