बालभारतीच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध उपक्रम राबवा – दादाजी भुसे

बालभारतीच्या स्थापनेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभर विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सहभागातून राबविण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. बालभारतीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत शैक्षणिक उपक्रम, पुस्तक साठवणूक आणि दर्जेदार साहित्यनिर्मितीवर भर देण्यात आला.

May 7, 2026 - 20:15
 0  3
बालभारतीच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांच्या सहभागातून विविध उपक्रम राबवा – दादाजी भुसे
बालभारती, हिरक महोत्सव, दादाजी भुसे,

मुंबई, दि. ६ : येणारे वर्ष हे बालभारतीच्या स्थापनेचे हिरक महोत्सवी वर्ष असल्याने या निमित्त राज्यभर विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सहभागातून राबविण्यात यावेत, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

बालभारतीच्या नियामक मंडळाची २५९ वी सभा मुंबई येथे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या सभागृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे होते. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, एससीईआरटीचे संचालक डॉ. हेमंत वसेकर, बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक, शिक्षण संचालक (माध्यमिक) महेश पालकर, उपसचिव तुषार महाजन आदी उपस्थित होते.

मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, राज्यात शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा केला जातो. त्यावेळी बालभारतीच्या माध्यमातून विविध शैक्षणिक आणि सर्जनशील उपक्रम आयोजित करण्यात यावेत. या माध्यमातून नागरिकांना बालभारतीने वर्षानुवर्षे केलेल्या सकारात्मक कार्याची माहिती मिळेल.

बालभारतीच्या पुस्तकांसाठी आवश्यक असणाऱ्या कागद साठवणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जागा खरेदी करण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून इतर शासकीय विभागांच्या उपलब्ध जागांचा वापर करण्याचा पर्याय तपासावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच शालेय शिक्षण विभागाच्या विविध शाखांकडे राज्यभरात उपलब्ध असलेल्या जागांचे सर्वेक्षण करून त्यांचा विकास करण्यासाठी उपाययोजना आखाव्यात, असेही त्यांनी नमूद केले.

दर्जेदार साहित्य निर्मितीला प्रोत्साहन द्या – डॉ. पंकज भोयर

शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी बालभारतीसाठी दर्जेदार लेखन करणाऱ्या लेखकांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला. यासाठी पारितोषिक योजना राबविणे तसेच उत्कृष्ट साहित्य ‘किशोर’ मासिकामध्ये प्रकाशित करण्याची सूचना त्यांनी केली.

राज्यातील शासनाच्या विद्यानिकेतन शाळांमधील इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याबाबत अभ्यास करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच समाजमाध्यमांवर शाळांबाबत माहिती देणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सना शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या चांगल्या उपक्रमांची माहिती उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी केली.

यावेळी बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची आणि कामकाजाची सविस्तर माहिती सादर केली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0