च-होली खुर्दमध्ये पाईप गोडाऊनला भीषण आग; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर नियंत्रण

आळंदीतील च-होली खुर्द येथे पाईप गोडाऊनला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली असून जीवितहानी टळली, मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले.

May 7, 2026 - 05:54
 0  5
च-होली खुर्दमध्ये पाईप गोडाऊनला भीषण आग; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर नियंत्रण
च होली खुर्द आग, आळंदी आग, पुणे आग

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

 (दि. ६ मे २०२६)

पुणे जिल्ह्यातील आळंदी परिसरात आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. च-होली खुर्द येथील साई गार्डन कार्यालयाजवळ असलेल्या पाईप गोडाऊनला दुपारी साडेतीनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला सतर्क करण्यात आले. मात्र, आळंदी नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन नादुरुस्त असल्याने तातडीने पिंपरी-चिंचवड, चाकण तसेच पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या पथकांना पाचारण करण्यात आले. विविध पथकांनी घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.

सुमारे दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, गोडाऊनमधील साहित्य जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आळंदी शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत आगीच्या घटनांची मालिका सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ३० एप्रिल रोजी भराव रस्त्याजवळील धर्मशाळेजवळील पाला-पाचोळ्याला आग लागली होती, तर ३ मे रोजी सुयोग मंगल कार्यालयाजवळील मोबाईल टॉवर परिसरात वैरणीला आग लागण्याची घटना घडली होती. आजची घटना ही त्या मालिकेतील आणखी एक गंभीर घटना ठरली आहे.

याच दिवशी च-होली खुर्द पुलाजवळ कचऱ्यालाही आग लागून परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आगीच्या घटना वाढत असताना आळंदी नगरपरिषदेचे अग्निशमन वाहन दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले होते. पर्यायी व्यवस्था का ठेवण्यात आली नाही, तसेच स्थानिक अग्निशमन यंत्रणा वेळेत का पोहोचली नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

एकूणच, सततच्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0