खादी व ग्रामोद्योग मंडळाचे ‘मधुमित्र’ आणि ‘मधुसखी’ पुरस्कार जाहीर; २० मे रोजी संभाजीनगरात वितरण

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने २०२६ सालचे ‘मधुमित्र’ आणि ‘मधुसखी’ पुरस्कार जाहीर केले आहेत. जागतिक मधमाशी दिनानिमित्त २० मे रोजी संभाजीनगर येथे पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली.

May 15, 2026 - 22:27
 0  2
खादी व ग्रामोद्योग मंडळाचे ‘मधुमित्र’ आणि ‘मधुसखी’ पुरस्कार जाहीर; २० मे रोजी संभाजीनगरात वितरण
मधुमित्र पुरस्कार, मधुसखी पुरस्कार, रवींद्र साठे, खादी ग्रामोद्योग मंडळ,

मुंबई प्रतिनिधी उदय कासारे: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने दिले जाणारे ‘मधुमित्र’ आणि ‘मधुसखी’ पुरस्कार २०२६ साठी जाहीर करण्यात आले आहेत. जागतिक मधमाशी दिनानिमित्त २० मे रोजी संभाजीनगर येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) रवींद्र साठे यांनी दिली.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र साठे यांनी सांगितले की, राज्यातील मधमाशीपालन करणाऱ्या मधपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी २०२३ पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. यावर्षीच्या पुरस्कारासाठी ज्ञानेश्वर मलीले लादूरा, गणेश बुरकुल (संभाजीनगर), राजेंद्रदास बैरागी (बुलढाणा) आणि श्वेता वायाळ (पुणे) यांची निवड करण्यात आली आहे.

याशिवाय विशेष सन्मानासाठी श्री. चंद्रकांत तरे (ठाणे), संजय मारणे (पुणे), दयावान पाटील (कोल्हापूर) आणि विद्यानंद आहिरे (जळगाव) यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारामध्ये स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देण्यात येणार आहे.

साठे म्हणाले की, राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मध संचालनालय राज्यात मधमाशीपालनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. यात मधमाशीपालन प्रशिक्षण, जनजागृती मेळावे, मध महोत्सव, मधुमित्र-मधुसखी पुरस्कार तसेच ‘मधाचे गाव’ योजनेचा समावेश आहे.

‘मधाचे गाव’ योजनेसाठी राज्य शासनाने १७ कोटी रुपयांची तरतूद केली असून पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांतील दहा गावांमध्ये काम सुरू झाले आहे. गेल्या दोन महिन्यांत या गावांमध्ये ३४८ मधपाळांना प्रशिक्षण देण्यात आले असून १७५० मधपेट्या, संरक्षण पोशाख, मध प्रक्रिया यंत्र आणि अन्य साहित्याचे वितरण करण्यात आले आहे.

या योजनेमुळे मध उत्पादन वाढ, पर्यावरण संवर्धन, स्थानिक रोजगार निर्मिती आणि पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास रवींद्र साठे यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ गेल्या ६५ वर्षांपासून कार्यरत असून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना आणि मध केंद्र योजना राबविण्यात येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी उत्पादनांचा वापर वाढवण्याचे आवाहन केले असून त्यानुसार खादी मंडळाने ‘हर घर खादी, घर घर खादी’ ही घोषणा दिली आहे. नागरिकांनी ग्रामीण भागातील लघुउद्योजकांनी तयार केलेल्या खादी वस्त्रांपासून हातकागद उत्पादने, गणेशमूर्ती तसेच मधापासून बनविलेली सौंदर्यप्रसाधने यांचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या पत्रकार परिषदेला मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0