जोतिबा व अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा; दर्जेदार कामांवर भर – जिल्हाधिकारी विजय राठोड

कोल्हापूरमध्ये जोतिबा आणि अंबाबाई देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी आढावा घेत, कामे गुणवत्तापूर्ण आणि लोकसहभागातून करण्याच्या सूचना दिल्या.

Apr 16, 2026 - 22:09
 0  1
जोतिबा व अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा; दर्जेदार कामांवर भर – जिल्हाधिकारी विजय राठोड
कोल्हापूर बातमी, जोतिबा मंदिर, अंबाबाई मंदिर, तीर्थक्षेत्र विकास

कोल्हापूर, दि. १६ (जिमाका) : जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी श्री जोतिबा तसेच श्री अंबाबाई देवस्थान तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात ऑनलाइन पद्धतीने घेतला.

या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीरच्या प्रांताधिकारी मोसमी बर्डे-चौगुले, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, देवस्थान समितीचे शिवराज नाईकवडे आदी उपस्थित होते.

बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राठोड यांनी सांगितले की, विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेली सर्व कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावीत. तसेच या कामांमध्ये स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि विश्वास महत्त्वाचा असल्याने त्यांना विश्वासात घेऊन कामे करावीत.

जोतिबा मंदिर परिसरात अतिक्रमणाची स्थिती काय आहे, तसेच त्या परिसरातील रस्ते आणि कनेक्टिव्हिटीची स्थिती कशी आहे, याची सविस्तर माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.

निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी येत्या १६ मेपासून जनगणनेचे काम सुरू होणार असल्याने त्यापूर्वी अंबाबाई देवस्थान परिसरातील जागांचे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

करवीरच्या प्रांताधिकारी मोसमी बर्डे-चौगुले यांनी अंबाबाई मंदिर परिसरातील भूसंपादनाबाबत प्रशासनाने दोन बैठका घेतल्याची माहिती दिली.

जिल्हाधिकारी राठोड यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सद्यस्थितीचा बारकाईने आढावा घेत पुढील कामकाज गतीमान करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीस पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तसेच महानगरपालिकेचे शहर अभियंता श्री. मस्कर, आर्किटेक्ट रेवा पेठे आणि संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0