हरियाणात महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा जागर; ‘लोकायन लोकोत्सव’ ४ आणि ५ जून रोजी गुरुग्राममध्ये

महाराष्ट्राची लोकपरंपरा, लोकसंस्कृती आणि कलावैभव राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी हरियाणातील गुरुग्राम येथे ४ आणि ५ जून २०२६ रोजी ‘लोकायन लोकोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात महाराष्ट्रातील विविध पारंपरिक आणि लोककला प्रकारांचे सादरीकरण होणार आहे.

May 27, 2026 - 21:20
 0  4
हरियाणात महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा जागर; ‘लोकायन लोकोत्सव’ ४ आणि ५ जून रोजी गुरुग्राममध्ये
लोकायन लोकोत्सव, महाराष्ट्र लोककला, गुरुग्राम कार्यक्रम

मुंबई | प्रतिनिधी

महाराष्ट्राची समृद्ध लोकपरंपरा, वैविध्यपूर्ण लोकसंस्कृती आणि पारंपरिक कलावैभव राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘लोकायन लोकोत्सव’ या विशेष सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन हरियाणातील गुरुग्राम येथे ४ आणि ५ जून २०२६ रोजी करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सहकार्याने तसेच ‘लोकायन सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक व बहुउद्देशीय संस्था, मुंबई’ यांच्या सहयोगातून हा दोन दिवसीय सांस्कृतिक सोहळा पार पडणार आहे.

गुरुग्राम येथील एसजीटी युनिव्हर्सिटी येथे सायंकाळी ६ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून महाराष्ट्रातील विविध पारंपरिक आणि प्रयोगशील लोककला प्रकारांचे सादरीकरण यावेळी करण्यात येणार आहे.

या लोकोत्सवातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख देशाच्या विविध भागांपर्यंत पोहोचविण्यासोबतच लोककला जतन आणि संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे.

महाराष्ट्रातील विविध भागांतील नामांकित लोककलावंत या महोत्सवात सहभागी होणार असून लोकनृत्य, लोकसंगीत, पोवाडे, भारूड, गोंधळ, लावणी, दिंडी, लोकनाट्य, आदिवासी लोककला तसेच आधुनिक प्रयोगशील लोककलेचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

ग्रामीण संस्कृतीतील जीवनमूल्ये, परंपरा, लोकसंवेदना आणि सामाजिक आशय या कलाविष्कारांतून प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहेत.

‘लोकायन लोकोत्सव’ हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणारा एक वैचारिक आणि कलात्मक उपक्रम ठरणार आहे. भारतीय संस्कृतीतील ‘विविधतेत एकता’, सामाजिक समरसता आणि लोककला संवर्धनाचा संदेश विविध कलाप्रकारांतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविला जाणार आहे.

सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोककलावंतांना राष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नव्या पिढीला लोकपरंपरांशी जोडणे आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अधिक मजबूत करणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.

गुरुग्राममधील रसिक प्रेक्षकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अनोखा अनुभव घेण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध होणार असून, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0